धुळ्यातील राड्यानंतर शिवसेनेच्या 22 जणांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बोरसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की कार्यालयात मंगळवारी सकाळी साडेअकराला शिवसेनेचे 20 ते 22 पदाधिकारी, कार्यकर्ते कोणतीही पूर्व कल्पना न देता आले. त्यांनी शहरातील काही शाळा अधिकचे शैक्षणिक शुल्क आणि डोनेशन आकारतात या कारणावरून बेकायदेशीर जमाव करत, मोठ्याने घोषणाबाजी आणि शिवीगाळ करत आपल्याला अपशब्द वापरले. टेबलवरील शासकीय कागदपत्र फेकून कामकाजात अडथळा निर्माण केला.

धुळे,: येथील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांना कार्यालयात दमदाटी करीत शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेनेच्या 20 ते 22 पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 
माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. बोरसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की कार्यालयात मंगळवारी सकाळी साडेअकराला शिवसेनेचे 20 ते 22 पदाधिकारी, कार्यकर्ते कोणतीही पूर्व कल्पना न देता आले. त्यांनी शहरातील काही शाळा अधिकचे शैक्षणिक शुल्क आणि डोनेशन आकारतात या कारणावरून बेकायदेशीर जमाव करत, मोठ्याने घोषणाबाजी आणि शिवीगाळ करत आपल्याला अपशब्द वापरले. टेबलवरील शासकीय कागदपत्र फेकून कामकाजात अडथळा निर्माण केला. तसेच मारण्याचा प्रयत्न केला. शिवाय या प्रकाराची सोशल मीडियावर चित्रफीत व्हायरल करून आपली बदनामी केली. संसर्गजन्य कोविड 19 च्या अनुषंगाने शिवसेनेच्या संबंधित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकाराचे मास्क परिधान न करता शारीरिक अंतराचे पालन केले नाही. त्यावरून शिवसेनेचे महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, विजय भट्टड, माजी जिल्हाप्रमुख भूपेंद्र लहामगे, उपजिल्हाप्रमुख धीरज पाटील, उपमहानगरप्रमुख संदीप सूर्यवंशी, कैलास मराठे, रामदास कानकाटे, पुरुषोत्तम जाधव, दीपक चव्हाण यांच्यासह अन्य 8 ते 10 जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule after rada case registered against shivsainik