शाळा उघडण्याच्या तीन दिवस अगोदरच शिक्षकांची जत्रा

teacher corona testing
teacher corona testing

धुळे : राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून अटीशर्तीनुसार सर्व प्रकारच्या शाळांतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासह (सिव्हील) जिल्ह्यातील विविध शासकीय केंद्रांवर तेराशे शिक्षकांनी तपासणीसाठी नमुने दिले. पैकी जिल्हा रुग्णालयात सातशेवर शिक्षकांनी एकच गर्दी केल्याने जत्रा भरल्याचे चित्र होते. 


सरकारने नववी ते बारावीपर्यंतचे वसतिगृह, आश्रमशाळा, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यालाही परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यापूर्वी आणि शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत व्यवस्थापनांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पालकांची संमती अनिवार्य केली आहे. 

आरटी- पीसीआर चाचणी 
शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. त्यांनी रॅपीड अँटीजेन नव्हे तर आरटी- पीसीआर चाचणी करणे आवश्‍यक आहे. रॅपीड टेस्टमध्ये नाकातून स्राव, तर आरटी- पीसीआर टेस्टमध्ये घशाचा स्राव तपासणीसाठी घेतला जातो. या तपासणीनंतर प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवाल शिक्षक, कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनांकडे सादर करायचा आहे. आजारी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शाळेत येऊ नये, अशी सूचना आहे. तसेच शिक्षक- पालक बैठका ऑनलाइन घ्याव्यात, तर परिपाठ, स्नेहसंमेलन, क्रीडा व तत्सम कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. शाळेत हात धुण्याची व्यवस्था, वर्गांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन, शारीरिक अंतर पाळणे, मास्क वापरणे आदी निरनिराळ्या उपाययोजना असाव्यात. 

डॉ. बोरसे यांची माहिती 
या पार्श्वभूमीवर माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांनी सांगितले, की जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा रोज भरेल. मात्र, ५० टक्के विद्यार्थी असावेत. उदा. एका वर्गात ४० विद्यार्थी आहेत. पैकी पहिल्या दिवशी २०, तर उर्वरित दुसऱ्या दिवशी २०, तिसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी उपस्थितीतील २० विद्यार्थी, अशा क्रमाने आलटूनपालटून विद्यार्थी उपस्थित असतील. त्यामुळे शिक्षकांना एक परिपाठ दोन वेळेस घ्यावा लागेल. यात क्रियाशीलता बाळगली तर पहिल्या दिवशीचा परिपाठ रेकॉडिंग करून किंवा घरी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सामावून घेऊन शिकविता येऊ शकेल. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शासकीय संस्थेत कोरोना चाचणी करावी. 

पवार, डॉ. मोरेंची भूमिका 
प्राथमिकचे शिक्षणाधिकारी मनिष पवार म्हणाले, की शिक्षकांना कोरोना चाचणी करून अहवाल सादर करणे आवश्‍यक आहे. जिल्हा रुग्णालय किंवा घोषित शासकीय संस्थेत कोरोना चाचणी मोफत उपलब्ध आहे. शिक्षक, कर्मचाऱ्यांना खासगी लॅबमधील तपासणीचा खर्च दिला जाणार नाही. महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे म्हणाले, की शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात कोरोना चाचणी करावी. महापालिका तपासणी अहवाल देऊ शकत नाही. 
 
गर्दी टाळा, पण शिक्षकांची जत्रा 
सरकार म्हणते कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी टाळा आणि शाळा सुरू होण्यास पाच दिवसांचा अवधी असल्याने शेकडो शिक्षकांनी कोरोना चाचणीसाठी गर्दी केल्याने सरकारच नियमांना हरताळ फासत असल्याची टिका काही शैक्षणिक संघटनांनी केली. काही शिक्षकांनी रॅपीड अँटीजेन टेस्ट केली. ती ग्राह्य मानली जाणार नाही. त्याविषयी काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा रुग्णालयासह घोषित केंद्रांवर बुधवारी शिक्षक, कर्मचाऱ्यांची गर्दी उसळल्याने गोंधळाचे चित्र दिसून आले. 
 
धुळ्यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी 
धुळे शहरातील साक्री रोडवरील जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या एकूणच संकटकाळात प्रथमच बुधवारी रेकॉर्ड ब्रेक ७४८ जणांनी चाचणीसाठी गर्दी केली. त्यामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची नुमने घेताना दमछाक झाली. याशिवाय साक्री येथे १५०, शिरपूर येथे १०६, दोंडाईचा येथे ३९०, असे एकूण १३६४ जणांनी नमुने तपासणीसाठी दिले. यात तेराशेवर शिक्षक, कर्मचारी होते, अशी माहिती जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी दिली. 

संपादन ः राजेश सोनवणे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com