
पाल्याला शाळेत लवकर घालण्यात पालकांना इतकी कां घाई झाली आहे? आणि सरकार आपले निर्णय, विचार इतके भराभर कां बदलते ? दर चार-आठ दिवसांनी एक नवा निर्णय निघतो.
धुळे : गेल्या दोन चार वर्षात सरकारने चांगला निर्णय घेतला होता की, मुलांना ६ वर्ष पूर्ण झाल्यावर इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश द्यायचा आणि आतां पालकांच्या आग्रहाला बळी पडून पुन्हा निर्णय बदलला आहे की, (CBSC शिक्षणपध्दती प्रमाणे) साडेपाच वर्षे पूर्ण झालेल्या मुलांना इयत्ता पहिलीत प्रवेश द्यायचा. आपल्या पाल्याला शाळेत लवकर घालण्यात पालकांना इतकी कां घाई झाली आहे? आणि सरकार आपले निर्णय, विचार इतके भराभर कां बदलते ? दर चार-आठ दिवसांनी एक नवा निर्णय निघतो.
इयत्ता पहिलीत प्रवेशाचे वय सहा वर्षे केले म्हणजे ज्या पालकांच्या पाल्याचे वय सहा वर्षापेक्षा १ दिवसही कमी असते ते पालक धासतावतात की, या एका दिवसामुळे माझा पाल्य माझ्या शेजाऱ्यांच्या पाल्यापेक्षा १ वर्षाने मागे पडेल. माझे नाक कापले जाईल! समाजात, नातेवाईकांत, शेजाऱ्या-पाजाऱ्यांत मला मान खाली घालावी लागेल की, माझे मुल मागे पडले. ही एक चुकीची विचारसरणी आहे......खरोखर असे होते काय ?
तारीख- महिना ठरवून दिलेला
एक महत्वाचे तत्व लक्षात घ्या की, आपल्या पाल्याची किंवा आपलीही स्पर्धा ही दुसऱ्याशी नको, तर आपल्या स्वतःशी असावी. स्वत:च्या मागच्या वेळेच्या कामगिरीपेक्षा यावेळेची कामगिरी चांगली कशी होईल हा आपला विचार असावा. शाळेत पहिलीत प्रवेश मिळण्याचे वय ६ वर्षे आहे, त्यात सरकारने जन्म तारखेप्रमाणे तारीख व महिना ठरवून दिलेला आहे की, ६ वर्षापेक्षा ३-४ महिने लहान मुल इयत्ता पहिलीत टाकता येते.
पाल्यांना होवू द्या सक्षम
लहान मुलांची शारीरीक व मानसिक क्षमता, आकलनशक्ति आणि बौध्दिक वाढ ही वयाच्या ५-७ वर्षापर्यंत दर वर्षी झपाट्याने होते. नंतर ती दरवर्षी तेवढी होत नाही. आईच्या पोटांत एक- दोन पेशींपासून सुरुवात होऊन नऊ महिन्यात बाळाचे पूर्ण शरीर तयार होते; म्हणजे त्या नऊ महिन्यात अब्जावधी पेशींची वाढ होते. इतकी वाढ जन्मानंतर होत नाही. ३- ४ वर्षे वय होईपर्यंत समजणे, बोलणे, रांगणे, चालणे, पळणे इ. क्षमता दर पंधरा ते तीस दिवसात हळू हळू वाढतात...तर पांच वर्षे वयानंतर आपण ५-७ महिन्याकरीता घाई कां करतो? पाल्याला सक्षम होऊ द्या मग शाळेत टाका. ६ व्या वर्षी मुल पहिलीत जाते म्हणजे वयाच्या तिसऱ्या वर्षी नर्सरीत आणि चार वर्ष पुर्ण झाल्यावर ज्युनिअर बालवाडीत जाते. पण बऱ्याच ठिकाणी दुसऱ्या वर्षानंतर मुलांना नर्सरी मध्ये टाकले जाते.
पालकांना घाई का?
लहानपणी वयाच्या तिसऱ्या चवथ्या वर्षापर्यंत बालकांना घराच्या सुरक्षित वातावरणात रहाणे शारिरीक व मानसिक दृष्टया जरुरीचे असते. पण नोकरी करणाऱ्या दोघे पालकांना वेळ नसतो म्हणून म्हणा की, शेजाऱ्यांशी किंवा नातेवाईकांशी स्पर्धा करण्याच्या प्रवृत्तीमुळे म्हणा मुल दोन वर्षाचे झाल्यास त्याला नर्सरीत पाठवण्याची पालक घाई करतात हे चुकीचे आहे. इतक्या लहान वयांत घरांतल्या संरक्षित वातावरण जेथे मुलांना रहायला आवडते, त्या घरापासून त्यांना दूर पाठवायची घाई करुन आपण मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम करतो याचा मुलांची मानसिकता, विचार करण्याची पध्दत, वागण्याची पध्दत यावर जन्मभर टिकणारा विपरीत परिणाम होतो. हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.....म्हणून घाई करु नका. Haste Makes Waste (घाई वाया जाते) ही म्हण लक्षात ठेवायला पाहिजे.