
कॉंग्रेसची सत्ता नसतानाच्या काळात राज्यात विकासाचा वेग मंदावला. अनेक प्रश्नांची गुंतागुंत सुटण्याऐवजी वाढली.
धुळे ः धुळे व साक्री तालुक्याला वरदान ठरणारा निम्म पांझरा अक्कलपाडा मध्यम सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरायचे असेल तर पश्चिमेकडील आणखी काही गावांचे शेती क्षेत्र बुडिताखाली येणार आहे. त्याबदल्यात मोबदला देण्यासाठी ३०० कोटींपेक्षा अधिक निधी लागेल. याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय होईल. प्रकल्पाचा लाभ संबंधित सर्व शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्नशील आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील (Kunal Patil ) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आवश्य वाचा- अन्यथा वीजतारांना स्पर्शू करून आत्महत्या करू!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील उपस्थित होते. आमदार पाटील म्हणाले, की धुळे शहरालगत औद्योगिक वसाहत विकसीत व्हावी, गोंदूर येथील विमानतळ विकसीत व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विमानतळासाठीच्या जागेचा प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून राज्य सरकारकडे येणार आहे. कॉंग्रेसची सत्ता नसतानाच्या काळात राज्यात विकासाचा वेग मंदावला. अनेक प्रश्नांची गुंतागुंत सुटण्याऐवजी वाढली. अक्कलपाडा प्रकल्पाचे काम पूर्ण झाले. परंतु, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला तर त्याच्या पाण्याखाली आणखी काही शेतजमीन येणार आहे. संबंधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी ३०० कोटीहून अधिक निधी लागेल. हा धोरणात्मक निर्णय सरकारच्या पातळीवर होईल. आर्थिक परिस्थितीचा प्रश्न सर्वांसमोर आहे. त्याला राज्य सरकार अपवाद नाही. शहरालगत महामार्ग चौपदरीकरणाचे कामदेखील मोबदला देण्यासाठीच थांबले आहे. परंतु, त्यावर लवकरच तोडगा निघेल. सरदार सरोवर प्रकल्पातील पाणी मिळविण्याचा प्रयत्न होईल. तापी खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून जामफळ धरण भरून घेणे यासह अपूर्ण अवस्थेत असलेल्या सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होतील, असेही आमदार पाटील यांनी नमूद केले.
आवर्जून वाचा- धुळ्यात सभापती, उपसभापती फायनल !
काँग्रेस सोडणाऱ्यांना पश्चात्ताप...
कॉंग्रेस पक्ष सत्तेत आला आहे. त्यापूर्वी जिल्ह्यातील काही कॉंग्रेस नेते आणि त्यांचे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात स्थलांतरित झाले. यातील अनेक जण पश्चात्ताप करीत आहेत. त्यांनी पुन्हा कॉंग्रेस पक्षात यावे यासाठी प्रयत्न करेल. पण, त्याचवेळी अनेक वर्षापासून कॉंग्रेस पक्षाशी प्रामाणिक असलेल्या कार्यकर्त्यांना पक्ष सन्मानाने वागवेल. याकडे मी लक्ष देईल. तरुणांना सोबत घेऊन पक्षाचे संघटन वाढवीत जनाधार वाढविला जाईल, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.
संपादन- भूषण श्रीखंडे