चांगली बातमी..विवंचनेत असताना मदतीचा हात; उच्चशिक्षणासाठी १५ लाख 

भगवान जगदाळे
Sunday, 6 December 2020

साजिद मन्सुरी याची रशियातील किरगिस्तान येथे वैद्यकीय क्षेत्रातील ‘एमबीबीएस’ या उच्च पदवी शिक्षणासाठी निवड झाली. परंतु पुरेशा पैशांअभावी साजिदचा प्रवेश रखडला होता. 

निजामपूर (धुळे) : साक्री तालुका अंगणवाडी कार्यकर्तींच्या सहकारी पतसंस्थेतर्फे धमनार (ता. साक्री) येथील अंगणवाडी सेविकेच्या मुलाला परदेशात उच्चशिक्षण घेण्यासाठी सुमारे १५ लाखांवर कर्ज मंजूर करण्यात आले असून, एखाद्या अंगणवाडी सेविकेला एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज उपलब्ध करून देण्याची ही तालुक्यासह जिल्ह्यातील दुर्मिळ घटना आहे. बुधवारी (ता. २) पतसंस्थेचे संस्थापक प्रा. नरेंद्र तोरवणे यांच्या हस्ते १५ लाखांचा धनादेश संबंधित अंगणवाडी सेविकेकडे सुपूर्द करण्यात आला. 
धमनार येथील अंगणवाडीसेविका असमा मन्सुरी व येथीलच माध्यमिक शिक्षक लतीफ मन्सुरी या दांपत्याचा मुलगा साजिद मन्सुरी याची रशियातील किरगिस्तान येथे वैद्यकीय क्षेत्रातील ‘एमबीबीएस’ या उच्च पदवी शिक्षणासाठी निवड झाली. परंतु पुरेशा पैशांअभावी साजिदचा प्रवेश रखडला होता. 

विवंचनेत असतानाच आला मदतीचा हात
मुलाच्या विदेशातील उच्च शिक्षणासाठी मन्सुरी दांपत्य आर्थिक विवंचनेत होते. मात्र साक्री येथील अंगणवाडी सेविकांच्या सहकारी पतसंस्थेचे संस्थापक प्रा. नरेंद्र तोरवणे व पतसंस्थेच्या अध्यक्षा संगीता तोरवणे यांनी पुढाकार घेत पतसंस्थेच्या सभासद असलेल्या असमा मन्सुरी या अंगणवाडी सेविकेस सुमारे १५ लाख रुपये कर्जाऊ आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देत मदतीचा हात दिला. पतपेढीतर्फे नुकतेच धनादेशाचे वितरण करण्यात आले. पतसंस्थेचे कर्मचारी उज्ज्वल अग्निहोत्री, चैताली दीक्षित, शिवाजी राठोड आदी उपस्थित होते. 

अंगणवाडी सेविकेचा पाल्य वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसया उच्च पदवीचे शिक्षण घेतोय ही आमच्यासाठी अभिमानाची बाब असून, सभासद पाल्यांच्या शिक्षणासाठी पतपेढीचे दरवाजे सतत खुले असून, पैसा कमी पडू दिला जाणार नाही. 
-प्रा. नरेंद्र तोरवणे, संस्थापक, अंगणवाडी सेविकांची सह.पतसंस्था, साक्री 

‘राज्यात सहकारी क्षेत्रातील बँका, पतसंस्था बंद पडत असतानाही कोरोना व लॉकडाउनचा पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम झाला नसून योग्य नियोजनामुळे २८ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या आमच्या पतसंस्थेने २५ हजार रुपये कर्जवाटपापासून आज १५ लाखांपर्यंत मजल मारली आहे. आगामी काळात अल्प मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका सभासदांना अल्प व्याजदरात शैक्षणिक कर्जासह गृहकर्ज व शौचालय बांधकामासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.’ 
- संगीता तोरवणे, अध्यक्षा, अंगणवाडी सेविकांची सह.पतसंस्था, साक्री 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule andanwadi sevika child high education help in 15 lakh