esakal | गांजामुळेच अधिकाऱ्यांची पाच कोटीची चांदी
sakal

बोलून बातमी शोधा

anil gote

पीक पाहणी लावताना तलाठी व कोतवाल शेती शिवारात फिरतात. त्यांना हे सर्व माहिती आहे. तरीही त्या क्षेत्रात गांजा असूनही वेगळाच पेरा लावला जातो. म्हणजे यास महसूल विभागही मोठा जबाबदार आहे.

गांजामुळेच अधिकाऱ्यांची पाच कोटीची चांदी

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

कापडणे (धुळे) : शिरपूर तालुका गांजा उत्पादनाचे हब झाले आहे. आदिवासीबहुल पाड्यात तलाठी, मंडळाधिकारी, तहसीलदार, प्रांत अधिकारी व वन कर्मचाऱ्यांची अभद्र टोळी कार्यरत झाली आहे. सांगवी पोलीस ठाण्यात बदली व्हावी म्हणून ५० लाखाची बोली लावली जाते. या गांजा शेतीमुळेच अधिकाऱ्यांची किमान पाच कोटीची चांदी होत असल्याचा आरोप राष्र्टवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. 

माजी आमदार गोटे यांनी नगाव (ता. धुळे) जवळील मल्हार बागमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राष्‍ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजीत भोसले, तेजस गोटे, प्रशांत भदाणे, संजय बगदे, अविनाश वाघ आदी उपस्थित होते. माजी आमदार गोटे यांनी सांगितले, की शिरपूर तालुक्यात सुमारे दीड हजारावर क्षेत्रात गांजा शेती सर्रास केली जात आहे. गेल्या तीन- चार वर्षांत या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. या भागात गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढला आहे. खंडणी गोळा करण्याचा व्यवसायानेही मूळ धरले आहे. 

पीक पाहणी करतात मग?
पीक पाहणी लावताना तलाठी व कोतवाल शेती शिवारात फिरतात. त्यांना हे सर्व माहिती आहे. तरीही त्या क्षेत्रात गांजा असूनही वेगळाच पेरा लावला जातो. म्हणजे यास महसूल विभागही मोठा जबाबदार आहे. तक्रार झाल्यास पोलीस नाटकीपणाने कारवाई करतात. तक्रारदारालाही यात गुंतविले जाते. 'सांगे त्यास टांगे' हा प्रकार वाढल्याने तक्रारी पुढे येत नाहीत. 

बदलीसाठी दर ठरलेले
शिरपूर विभागात एलसीबीचा पोलीस निरीक्षक म्हणून बदली होण्यासाठी ५० लाख ते एक कोटीची बिदागी द्यावी लागते. शिरपूर, सांगवी व थाळनेर पोलीस ठाण्यात बदली करण्यासाठीही अधिकाऱ्याला २५ ते ८० लाख मोजावे लागतात. तलाठी बदलीचा दर किमान दोन ते पाच लाखापर्यंत असल्याचा गंभीर आरोपही माजी आमदार गोटे यांनी केला. 

अधिकाऱ्यांचीच चौकशी व्हावी
गांजा उत्पादक शेतकरीच नाही. तर शासकीय, प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे. या भागात भाजपचे आमदार, खासदार व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आहेत. पण ते गांजा विरोधात अवाक्ष्रर काढत नाहीत. विशेष चौकशी पथक नेमून कारवाईची अपेक्षा श्री.गोटे यांनी व्यक्त केली. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image