esakal | दोन राज्‍यात ८६ गुन्हे; पण रिक्षाचालकाचे घर फोडले अन्‌ अडकला
sakal

बोलून बातमी शोधा

police arested

घरातून २२ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, रोकड लंपास झाली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने (एलसीबी) समांतर तपास सुरू केला.

दोन राज्‍यात ८६ गुन्हे; पण रिक्षाचालकाचे घर फोडले अन्‌ अडकला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील संभाप्पा कॉलनीत ३ सप्टेंबरला रिक्षाचालक उमाकांत चौधरी, संगिता चौधरी या दाम्पत्याकडे भरदुपारी घरफोडी झाली होती. त्यात लाखांहून अधिक रकमेचे दागदागिने, रोकड लंपास झाले होते. कष्टातून जमविलेला ऐवज लंपास झाल्याने चौधरी दाम्पत्याला अश्रू अनावर झाले होते. त्यामुळे एलसीबीने ही घटना मनावर घेऊन तपास केला आणि गुन्हाची उकल केली. त्यात बुलढाण्याच्या सराईत गुन्हेगाराला अटक केली. 

चौधरी यांच्या घरातून २२ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, रोकड लंपास झाली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने (एलसीबी) समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना किशोर तेजराव वायाळ (रा. मेरा बु., ता. चिखली, जि. बुलढाणा) याने एका साथीदाराच्या मदतीने दुचाकीवर येत हेल्मेट, रुमालाने चेहरा झाकत संभाप्पा कॉलनीत घरफोडी केल्याची माहिती मिळाली. हे संशयित साक्री रोडवर फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पथकास कारवाईचा आदेश झाला. 

सापळा रचला अन्‌
पथकाने महिंदळे शिवारात सापळा रचत बुलढाण्यातील संशयित वायाळला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता पथकाला २९ ग्रॅम ८८० मिली ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत व गुन्ह्यातील मोटारसायकल, असा एकूण एक लाख ४१ हजाराचा मुद्देमाल आढळला. तो जप्त केला. वायाळचा साथीदार संशयित राजेंद्र सोनू भोसलेने देऊळगाव राजा येथील वाणी नामक व्यक्तीची मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले आहे. तसेच त्याने जालना, बुलढाणा, बीड जिल्ह्यात दिवसा घरफोडी व चोरीचे गुन्हे कल्याचेही कबूल केले. संशयित किशोर वायाळ व त्याचा साथीदार अट्टल गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात ४६ गुन्हे, तर गुजरात राज्यात ४०, असे एकूण ८६ गुन्हे दाखल आहेत. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, हवालदार रफीक पठाण, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गौतम सपकाळे, कुणाल पानपाटील, राहुल सानप, विशाल पाटील यांनी ही कारवाई केली. ते वायाळच्या फरार साथीदाराचा शोध घेत आहेत.