ऍक्‍सिस बॅंकेला दोन कोटींचा चुना; धुळ्यात "आरटीजीएस', "एनईएफटी'चे खाते हॅक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

ऍक्‍सिस बॅंकेने धुळे विकास सहकारी बॅंकेला आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारासाठी पेप्रो (paypro) ऑनलाइन पोर्टलद्वारे सुविधा दिली आहे. त्यानुसार धुळे विकास बॅंकेच्या खात्यातून व्यवहार होण्यासाठी ठराविक रक्‍कम नेहमी ठेवण्यात येते.

धुळे : शहरातील ऍक्‍सिस बॅंकेची सिस्टिम हॅक करत आणि बेकायदेशीर व्यवहाराद्वारे 2 कोटी 6 लाख 50 हजार 165 रुपये एकूण 27 व्यवहारांतून परस्पर रक्कम वर्ग करून ही फसवणूक झाल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी ऍक्‍सिस बॅंकेचे शाखाधिकारी धनेश नामदेव सगळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

येथील धुळे विकास सहकारी बॅंकेचे "आरटीजीएस' आणि "एनईएफटी'चे खाते ऍक्‍सिस बॅंकेत आहे. यात ऍक्‍सिस बॅंकेने धुळे विकास सहकारी बॅंकेला आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारासाठी पेप्रो (paypro) ऑनलाइन पोर्टलद्वारे सुविधा दिली आहे. त्यानुसार धुळे विकास बॅंकेच्या खात्यातून व्यवहार होण्यासाठी ठराविक रक्‍कम नेहमी ठेवण्यात येते. याकामी दोन मेकर, दोन चेकर यांना अधिकृत "आयडी' देण्यात आला आहे. दोघांना ओटीपी सिस्टिमद्वारे मोबाईल क्रमांकावर मेसेज जातात. त्याची खात्री झाल्यावर धुळे विकास सहकारी बॅंकेच्या खातेदाराला व्यवहार करता येतो. 
सोमवारी (ता. 8) सकाळी नऊच्या सुमारास श्री. सगळे ऍक्‍सिस बॅंकेत आले. त्यांना शाखेचे मुख्य अभिषेक महाजन यांनी माहिती दिली, की धुळे विकास बॅंकेतर्फे कुठलेही व्यवहार झाले नसताना, तसेच कुठलाही ओटीपी मेसेज संबंधितांना आलेला नसताना सकाळी सात ते सव्वादहाच्या कालावधीत खात्यातून 2 कोटी सहा लाख 50 हजार 165 काढण्यात आले आहेत. धुळे विकास बॅंकेचे शाखाधिकारी अतुल उपासनी यांनी त्यासंदर्भात माहिती वरिष्ठ अविनाश त्रिपाठी यांना दिली. श्री. त्रिपाठी यांनी ज्या खात्यातून पैसे गेले आहेत, ती खाती गोठविण्याबाबत कारवाईची मेलद्वारे माहिती दिली. त्यानुसार श्री. सगळे यांनी विभागीय स्तरावरील वरिष्ठांना योग्य कार्यवाहीसाठी माहिती दिली. त्यात ऍक्‍सिस बॅंकेची सिस्टिम हॅक करून बॅंकेचा डाटा चोरला गेला. अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीर व्यवहारातून धुळे विकास सहकारी बॅंकेची ऍक्‍सिस बॅंकेमध्ये असलेल्या खात्यातून परस्पर रक्‍कम वर्ग करून फसवणूक केल्याची माहिती पुढे आली. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule axis bank 2 carore fraud rtgs and neft account hack