धुळे जिल्ह्यात २१७ कोटींचे पीककर्ज वाटप 

निखिल सूर्यवंशी
Saturday, 18 July 2020

जिल्ह्यात यंदा खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना एक हजार १०० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात खरिपासाठी ९२८ कोटी १६ लाख, तर रब्बीसाठी १७१ कोटी ८४ लाखांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे.

 
धुळे : खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत, खासगी आणि धुळे- नंदुरबार जिल्हा बँकेतर्फे यंदा १० जुलैपर्यंत जिल्ह्यातील २५ हजार १४७ शेतकऱ्यांना २१७ कोटी ७९ लाखांचे पीककर्ज वाटप झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली. 
जिल्ह्यात यंदा खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांना एक हजार १०० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात खरिपासाठी ९२८ कोटी १६ लाख, तर रब्बीसाठी १७१ कोटी ८४ लाखांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. 

बँकनिहाय वाटपाची स्थिती 
धुळे जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बँकांनी दहा हजार ३१३ शेतकऱ्यांना ११५ कोटी रुपये, खासगी बँकांनी ५११ शेतकऱ्यांना १२ कोटी ७२ लाख, तर धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने १४ हजार १६८ शेतकऱ्यांना ८८ कोटी सहा लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. 

समाधानकारक पाऊस 
शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज उपलब्ध होण्यासाठी पालकमंत्री तथा महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली बँक प्रतिनिधींच्या वेळोवेळी बैठकी झाल्या. त्यानुसार पीककर्ज वितरण सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पीकपेरा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बँकांनी पीककर्ज वितरणाचे नियोजन करावे, अशी सूचना पालकमंत्र्यांनी दिली. 

कर्जांचे फेरपुनर्गठण 
जिल्ह्यात २०१५ ते २०१९ दरम्यान दुष्काळसदृश स्थिती होती. त्यामुळे ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली. अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही वर्षांत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ न शकल्याने शेतकरी थकबाकीदार झाले. राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ जाहीर केली. त्यात एप्रिल २०१५ ते मार्च २०१९ दयारम्यान अल्प मुदतीचे पीककर्ज घेतलेल्या तसेच या कालावधीत अल्प मुदतीच्या पीक कर्जांचे पुनर्गठन, फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. 

कर्जमुक्ती योजनेचा लाभ 
फुले शेती कर्जमुक्ती योजनेंतर्गत धुळे जिल्ह्यातील १४ जुलै २०२० पर्यंत अपलोड केलेली कर्जखात्यांची संख्या ४९ हजार ५२९ आहे. विशिष्ट क्रमांकासह कर्जखात्यांची संख्या ४४ हजार ६४७ आहे. आधार प्रमाणीकरण झालेल्या खात्यांची संख्या ४१ हजार ८४३ आहे. पैकी ३९ हजार ८६ खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २९४ कोटी एक लाख रुपये जमा झाले आहेत. त्यात राष्ट्रीयीकृत, खासगी व इतर बँका मिळून २२ हजार ५२८ शेतकरी खातेदारांच्या बँक खात्यात २११ कोटी ७८ लाख रुपये, तर धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेतून १६ हजार ५५८ शेतकऱ्यांना ८२ कोटी २३ लाखांचा लाभ देण्यात आला. शिवाय आधार प्रमाणीकरण शिल्लक असलेल्या खात्यांची संख्या दोन हजार ८०४ असून, या खात्यांचे प्रमाणीकरण लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना आवाहन 
फुले शेती कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना पीककर्ज वाटपाचे नियोजन आहे. त्यानुसार १० जुलैअखेर राष्ट्रीयीकृत बँकांनी एक हजार १७४ शेतकऱ्यांना ३२ कोटी ७३ लाख रुपये, खासगी बँकांनी १८० शेतकऱ्यांना दोन कोटी २३ लाख रुपये, तर धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेतून एक हजार ९७७ शेतकऱ्यांना नऊ कोटी आठ लाखांचे कर्जवाटप झाले. आधार प्रमाणीकरण राहिलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार- सेवा केंद्र किंवा बँक शाखेतून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. योजनेत लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांनी पीककर्ज घेण्यासाठी संबंधित बँकेच्या शाखेत आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. शिंदे यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule bank 217 carrore pik loan distribute farmer