esakal | श्‍वानासाठी ‘त्या’ने पत्करला गुन्हेगारीचा मार्ग 
sakal

बोलून बातमी शोधा

श्‍वानासाठी ‘त्या’ने पत्करला गुन्हेगारीचा मार्ग 

तपासात संबंधित अल्पवयीन मुलाने देवपूरमधील रमाबाई आंबेडकरनगरमधील गणेश मरसाळे याच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली.

श्‍वानासाठी ‘त्या’ने पत्करला गुन्हेगारीचा मार्ग 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः श्‍वानाच्या मोहापायी अल्पवयीन मुलाने गुन्हेगारीचा मार्ग पत्करला. त्या मुलाला श्‍वान आवडतो, हे लक्षात आल्यावर त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलाने संबंधित अल्पवयीन मुलाला घरफोडी करायला सांगितली. त्यात त्याने गरुड बागेतील एका घरातून साडेसात लाखांचे दागदागिने लंपास केले. आव्हानात्मक या चोरीचा छडा शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने पाच तासांत लावला. त्यात ही धक्कादायक माहिती उजेडात आली. 

आवश्य वाचा- वेळेची शिस्त.. प्रोटोकॉलचा सन्मान अन्‌ पवार ! 

शहरात ग. स. बँकेलगत गरुड बागेत ‘शुभमकरोती’ निवासस्थान आहे. तेथे शेतकरी चंद्रजित सिसोदे वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडे दोन ते तीन दिवसांपूर्वी चोरी झाली. बेडरूममधून चोरट्याने सुमारे १५ तोळे वजनाचे आणि सात लाख ४० हजारांचे दागदागिने लंपास केले. तशी फिर्याद शहर पोलिसांत दाखल झाली. 


पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व पथकाने तपास सुरू केला. गरुड बाग परिसरातील अल्पवयीन बालकाच्या मदतीने ही घरफोडी झाल्याचा संशय व्यक्त झाला. तपास पथकातील सहाय्यक निरीक्षक नाना आखाडे, बैरागी, पोलिस नाईक मुख्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, हवालदार पंकज खैरमोडे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, अविनाश कराड यांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

त्याच्या पालकांना विश्वासात घेतले. तपासात संबंधित अल्पवयीन मुलाने देवपूरमधील रमाबाई आंबेडकरनगरमधील गणेश मरसाळे याच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार मरसाळेला अटक झाली. त्याच्यासह संबंधित मुलाकडून साडेसात लाखांचा सोन्याचा चारपदरी मोत्याचा हार, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचा हार, झुमके, हिरेजडित टॉप, कर्णफुले, हिरेजडित अंगठी, डायमंडचा कानातील टॉप जोड, सोन्याच्या चार बांगड्या, डायमंडचा आणि मोत्यांचा हार आदी मुद्देमाल जप्त केला. तपासाची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक प्रदीप पाडवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वाचा- सुयर्दशन नाही; दिवसभर पावसाची रिपरिप, मिरचीचे नुकसान

गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगा सामान्य कुटुंबातील आहे. संशयित गणेश मरसाळेकडे श्‍वान आहे. त्याच्या मोहापायी संबंधित मुलाने गणेशच्या मदतीने घरफोडी केली. या प्रकरणी पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी संबंधित मुलाचे समुपदेशन आणि पुनर्वसनाबाबत सूचना दिली. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील, आखाडे, बैरागी, हवालदार भिकाजी पाटील, पोलिस नाईक मुख्तार मन्सुरी, सतीश कोठावदे, योगेश चव्हाण, प्रल्हाद वाघ, संदीप पाटील, रवी गिरासे, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल पाटील, राहुल गिरी, अविनाश कराड, तुषार मोरे, प्रसाद वाघ, विवेक साळुंके यांनी ही कारवाई केली.  

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image