धुळ्यात २४ पासून जनता कर्फ्यू...असे लावलेय नियम 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 July 2020

कोरोनाची संसर्ग साखळी तोडणे व आवश्‍यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेत सोमवारी (ता. २०) दुपारी व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेचे पदाधिकारी, गटनेते व अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. महापौर चंद्रकांत सोनार अध्यक्षस्थानी होते.

धुळे : संसर्गजन्य कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन न करणे, अनावश्‍यक गर्दी आणि बेफिकीर नागरिकांमुळे महापालिका क्षेत्रातील स्थिती बिकट होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात शुक्रवारी (ता. २४) दुपारी चारपासून सोमवारी (ता. २७) सकाळी आठपर्यंत महापालिकेने जनता कर्फ्यू जाहीर केला. यात मेडिकल, घरपोच दूध सेवा वगळता किराणा, भाजीपाला, फळफळावळ विक्री बंद ठेवण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला. 
 
कोरोनाची संसर्ग साखळी तोडणे व आवश्‍यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेत सोमवारी (ता. २०) दुपारी व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेचे पदाधिकारी, गटनेते व अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. महापौर चंद्रकांत सोनार अध्यक्षस्थानी होते. आयुक्त अजिज शेख, उपमहापौर कल्याणी अंपळकर, अपर पोलीस अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, विरोधी पक्षनेते साबीर शेख, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नितीन बंग, महादेव परदेशी, सुभाष कोटेचा, ताथेड, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, नगरसेवक देवेंद्र सोनार, संजय पाटील, श्रीकिरण अहिरराव, रावसाहेब नांद्रे, गटनेते अमीन पटेल, भिकन वराडे, प्रवीण अग्रवाल, साहाय्यक आयुक्त विनायक कोते, पल्लवी शिरसाट आदी उपस्थित होते. 

धुळेकरांना मज्जाव 
महापौर सोनार म्हणाले, की शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कठोर कार्यवाहीची विविध स्तरावरून मागणी होत आहे. याप्रश्‍नी उपाययोजनांसाठी संयुक्त बैठक बोलावली. महापालिका आणि पोलीस प्रशासनामार्फत उपाययोजना करुनही नागरिकांची गर्दी कमी होत नाही. जनजागृतीनंतरही बेफिकीर नागरिक शारीरिक अंतर पाळत नाही, मास्कचा वापर टाळतात, विनाकारण हिंडतात, अनावश्‍यक गर्दी करतात. त्यामुळे शहर संकटात सापडत आहे. या स्थितीत कोरोना संसर्गाची साखळी तोडणे आवश्‍यक आहे. या पार्श्वभूमीवर शहरात २४ ला दुपारी चारपासून ते २७ जुलैला सकाळी आठपर्यंत जनता कर्फ्यू लागू केला जाईल. या कालावधीत मेडिकल व फक्त घरपोच दूध सेवा वगळता उर्वरित सर्व व्यापारी संस्था, प्रतिष्ठाने, हॉकर्स, विविध व्यवसाय, किराणा दुकाने, भाजीपाला, फळ विक्री पूर्णपणे बंद राहील. धुळेकरांना जनता कर्फ्यूमध्ये घराबाहेर पडण्यास मज्जाव असेल. 

महापौरांचे भावनिक आवाहन 
शहरातील कोरोना संसर्गाचा धोका कमी व्हावा, आरोग्य हितासाठी जनता कर्फ्यूचा निर्णय घेतला आहे. मी व माझ्या परिवाराने या संकटकाळातील दुःखद प्रसंगाचा सामना केला आहे. तशी वेळ इतर कुणावरही येऊ नये, नागरीकांनीही आपल्या जबाबदारीचे भान ठेवत नियमांचे पालन करावे, कुटुंबाला धोक्यात टाकू नये, असे भावनिक आवाहन महापौर सोनार यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule city 24 july janata carfew start