esakal | धुळ्यात चौफेर पसरतोय "कोरोना'! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corona

शहरातील निघाल्याने धुळेकरांना सकाळी- सकाळीच धक्का बसला. शहरातील रुग्ण विविध भागांतील आहेत. दरम्यान, महापालिकेने आज ते- ते भाग सॅनिटाइझ केले. साक्री रोडवरील एका खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा एक कक्षही "सील' केला. 

धुळ्यात चौफेर पसरतोय "कोरोना'! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : "कोरोना' विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने शुक्रवारचा (ता. 8) दिवस धुळे शहरासह जिल्ह्यासाठी धक्का देणारा ठरला. कारण, जिल्हा "रेड झोन'मध्ये गेलेला असला, तरी गेले दोन- तीन दिवस "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नव्हती. शुक्रवारी रात्रीच्या वैद्यकीय अहवालात मात्र एकूण 18 पैकी तब्बल 15 रुग्ण धुळे शहरातील निघाल्याने धुळेकरांना सकाळी- सकाळीच धक्का बसला. शहरातील रुग्ण विविध भागांतील आहेत. दरम्यान, महापालिकेने आज ते- ते भाग सॅनिटाइझ केले. साक्री रोडवरील एका खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचा एक कक्षही "सील' केला. 

सॅनिटायझेशन, हॉस्पिटल "सील' 
"कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळलेल्या काही भागांत, संपर्कातील हॉस्पिटल्समध्ये महापालिकेने आज सॅनिटायझेशन केले. दरम्यान, मोहाडी उपनगरमधील "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण साक्री रोड भागातील एका खासगी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी (डायलिसिस) गेल्याचे समोर आल्याने महापालिकेने या हॉस्पिटलमधील संबंधित कक्ष "सील' केला. जिल्ह्यात आढळलेला पहिला "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णदेखील याच हॉस्पिटलमध्ये गेला होता, त्यावेळीही येथील कक्ष "सील' करण्यात आला होता. शहरातील आणखी एका क्रिटिकल केअर सेंटरशी "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णाचा संपर्क आल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे पथक हॉस्पिटल "सील' करण्यासाठी गेले होते. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संबंधित रुग्ण हॉस्पिटलमध्ये आला नव्हता, बाहेरच्या बाहेरच गेला होता. त्यामुळे पथकाने येथे हॉस्पिटल "सील' करण्याची कारवाई केली नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

"ती' आकडेवारी नाही 
दरम्यान, जे "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून आले, त्यांच्या संपर्कातील किती व्यक्तींना क्वारंटाइन केले गेले, याबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून निश्‍चित आकडेवारी मिळाली नाही. मोहाडी उपनगरमधील रुग्णाच्या परिवारातील सदस्य तसेच त्यांच्या काही भाडेकरूंना तपासणीसाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविले होते, अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. 

मनपा कर्मचारीही तपासणीसाठी 
"कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णांमध्ये महापालिकेच्या देवपूरमधील प्रभातनगरमधील रुग्णालयातील आशा सेविकेचाही समावेश असल्याने, या रुग्णालयातील डॉक्‍टर, कर्मचाऱ्यांना तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे महापालिका अधिकाऱ्याने सांगितले. हे रुग्णालयही बंद करण्यात आले आहे. संबंधित आशा सेविकेच्या परिवारातील सदस्यांनाही होम क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

असे आहेत "कोरोना'चे भाग... 
शहरात "कोरोना' रुग्ण आढळलेले भाग असे ः आझादनगर, गजानन कॉलनी, फिरदोसनगर, वडजई रोड, स्नेहनगर, मच्छी बाजार, ताशा गल्ली, देवपूरमधील एकता हाउसिंग सोसायटी, साक्री रोड भागातील सत्यसाईबाबा सोसायटी, नगावबारी परिसरातील कदमबांडेनगर, नकाणे रोड (चौपाटीसमोर), कोरकेनगर, समतानगर, देवपूरमधील तलाठी कार्यालय परिसरात मोहम्मदीनगर, तसेच मोहाडी उपनगर. 

"सील' करण्याची कारवाई... 
धुळे शहरात शुक्रवारी रात्री पंधरा "कोरोना'बाधित रुग्ण आढळल्यानंतर त्यांचा परिसर नियमानुसार "सील' करण्याची कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू झालेली नव्हती. त्या- त्या भागातील नागरिक या प्रक्रियेची वाट पाहत होते. महापालिकेकडून काही सोपस्कार झाल्यानंतर सकाळपासून ही कारवाई सुरू केली जाणार असल्याचे सांगितले जात होते.
 

loading image
go to top