धुळ्यातील "कंटेन्मेंट झोन' वाढतेच! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 19 May 2020

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर संबंधित रुग्णाच्या निवासाचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून त्या भागात संचारबंदीसह विविध निर्बंध लावण्यात येतात. सुरवातीच्या काळात दीड किलोमीटरचा भाग कंटेन्मेंट झोन, तर लगतचा तीन-साडेतीन किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात येत होता.

धुळे : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले शहरातील आणखी दोन भाग महापालिकेने आज कंटेन्मेंट झोन (सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून घोषित केले. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या आता 26 झाली. दरम्यान, आणखी दोन भाग घोषित करण्याची कार्यवाही सुरू होती, त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या तब्बल 28 पर्यंत जाणार आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर संबंधित रुग्णाच्या निवासाचा भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करून त्या भागात संचारबंदीसह विविध निर्बंध लावण्यात येतात. सुरवातीच्या काळात दीड किलोमीटरचा भाग कंटेन्मेंट झोन, तर लगतचा तीन-साडेतीन किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात येत होता. मात्र, आता सखोल तपासणी, स्वच्छता व वैद्यकीय उपचाराच्या अनुषंगाने महापालिका आयुक्तांकडून क्षेत्रफळ कमी करून शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात येत आहे. या प्रक्रियेत यापूर्वी 24 प्रतिबंधित क्षेत्र घोषित होते. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांत पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने संबंधित भागही प्रतिबंधित घोषित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. यात आज सायंकाळपर्यंत दोन भागांची भर पडल्याने घोषित सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 26 झाली. 
 
नवीन कंटेन्मेंट झोन असे 
कंटेन्मेंट झोन- 25 ( शिक्षक कॉलनी, सुरत बायपास) 
उत्तर- श्री. शिंदे यांच्या भूखंड क्रमांक 13 पासून पूर्वेकडे श्री. पाटील यांच्या भूखंड- 9 मधील घरापर्यंत. 
पूर्व- श्री. पाटील यांच्या घरापासून दक्षिणेकडे पाटील महाविद्यालयापर्यंत. 
दक्षिण- पाटील महाविद्यालयापासून पश्‍चिमेकडे श्रीमती तायडे यांच्या भूखंड क्रमांक-28 पर्यंत. 
पश्‍चिम- श्रीमती तायडे यांच्या घरापासून उत्तरेकडे श्री. शिंदे यांचया भूखंड क्रमांक 13 पर्यंत. 

कंटेन्मेंट झोन-26 (भंगार बाजार, अन्सारनगर) 
उत्तर- गोपाल अन्सारी यांच्या घरापासून पश्‍चिमेकडे हबीब रहेमान अजगरअली यांच्या घरापर्यंत. 
पूर्व- खलील मेहंदी हसन यांच्या घरापासून मोहम्मदी मस्जिदपर्यंत. 
दक्षिण- शकील अहमद मेहंदी हसन यांच्या घरापासून खलील मेहंदी हसन यांच्या घरापर्यंत. 
पश्‍चिम- रब्बानी साहेबा यांच्या घरापासून रहिम शेख शकील अहमद मेहंदी हसन यांच्या घरापर्यंत. 

आणखी दोन क्षेत्र वाढणार 
शहरात आणखी दोन भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने संबंधित भागही सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू होती. त्यामुळे शहरातील सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या 28 पर्यंत जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule city contentment zone new aria