esakal | धुळ्यात रोजचा २०० टन कचरा जागच्या जागी पडून
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात रोजचा २०० टन कचरा जागच्या जागी पडून

धुळ्यात रोजचा २०० टन कचरा जागच्या जागी पडून

sakal_logo
By
निखील सुर्यवंशीधुळे : शहरातील कचरा संकलनाचे (Garbage collection) वॉटरग्रेस कंपनीचे काम थांबविण्याचा आदेश स्थायी समितीने दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांत शहरातील कचरा संकलनाचे काम जवळपास ठप्प झाले आहे. काही प्रभागांमध्ये एखादी घंटागाडी नावालाच फिरकत आहे. वॉटरग्रेस कंपनी कागदोपत्री दररोज २००-२२५ मेट्रिक टन कचरा संकलन होत होते. अर्थात काम ठप्प झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून किमान २०० मेट्रिक टन कचरा दररोज जागच्या जागी पडून आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून (Dhule Municipal Administration)अद्यापही पर्यायी व्यवस्थेवर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे.


शहरातील कचरा संकलनाचे केवळ १०-२० टक्के काम करायचे आणि १०० टक्के बिल काढायचे यासह वॉटरग्रेसच्या एकूणच कामाबाबत स्थायी समिती सभापतींसह सदस्यांनी गंभीर आरोप केले. या पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबरला झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत वॉटरग्रेसचे काम बुधवार (ता.६) पासून थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: हम तो डूबेंगे.. लेकिन सनम तुमको भी लेकर डुबेंगे’- खडसे


निर्णयानंतर काम ठप्प
स्थायी समितीने वॉटरग्रेसचे काम थांबविण्याचा निर्णय घेतल्यानंतर व महापालिकेकडे पर्यायी व्यवस्था तयार नसल्याने शहरातील कचरा संकलनाचा पूर्णपणे बोजवारा उडणार हे निश्‍चित होते. तीच स्थिती गेल्या तीन दिवसांपासून पाहायला मिळत आहे. काही प्रभागांमध्ये वॉटरग्रेसकडून एखाद-दुसरी घंटागाडी पाठविली जात असली तरी हा केवळ देखावा आहे. इतर सर्व घंटागाड्यांना ‘ब्रेक’ लागला आहे. गटारांमधील घाण, कचरा उचलण्यासाठी फिरणारे ३५ ट्रॅक्टरही पूर्णपणे बंद असल्याचे समजते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत शहरातील कचरा संकलनाची स्थिती अधिकच गंभीर बनली आहे.

चर्चा, नियोजन सुरुच
वॉटरग्रेसचे काम थांबविल्यानंतर सभापती संजय जाधव यांनी महापालिकेने आपल्या स्तरावरून पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ही पर्यायी व्यवस्था अद्यापही उभी राहिल्याचे दिसत नाही. याबाबत अधिकाऱ्यांचे संबंधितांशी चर्चेचे गुऱ्हाळ आजही सुरू होते अशी माहिती मिळाली. प्रशासनाला ट्रॅक्टर लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे, ते काम सध्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

ही कार्यवाही आवश्‍यक
वॉटरग्रेसचे काम थांबविल्यानंतर कंपनीला दिलेल्या घंटागाड्या ताब्यात घेण्याची कार्यवाही अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. घंटागाड्या कोणत्या स्थितीत आहेत, याची सर्व माहिती घेऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे, त्यामुळे त्यालाही वेळ लागण्याची शक्यता आहे. महापालिकेने वॉटरग्रेसला ७९ नव्याकोऱ्या घंटागाड्या दिल्या होत्या, यातील बहुतांश घंटागाड्यांची स्थिती खराब असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा: Jalgaon : अतिवृष्टीने सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाई मिटली

वर्कऑर्डर द्या अन् मोकळे व्हा!
महापालिकेने कचरा संकलनाचे काम निविदाप्रक्रीयेअंती स्वयंभू संस्थेला दिले आहे. मात्र, आमदार फारुक शाह यांच्या तक्रारीमुळे या प्रक्रियेला शासनाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे नवीन ठेक्याचे घोडे अडले आहे. वॉटरग्रेसचे काम थांबविल्यानंतर पर्यायी व्यवस्था उभी करण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी स्वयंभूला वर्क ऑर्डर देऊन मोकळे व्हा, अशी इच्छा अनेक नगरसेवकांसह काही अधिकाऱ्यांची आहे. मात्र, शासनाकडून स्थगिती असल्याने प्रशासन यावर निर्णय घेण्याचे धाडस दाखवत नसल्याचे चित्र आहे.

loading image
go to top