esakal | धुळ्यात गर्दीचा महापूर; मनपा प्रशासन, पोलिसांनी हात टेकले

बोलून बातमी शोधा

dhule crowd
धुळ्यात गर्दीचा महापूर; मनपा प्रशासन, पोलिसांनी हात टेकले
sakal_logo
By
निखील सुर्यवंशी


धुळे : संसर्गजन्य कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव कमी होण्यासाठी शासन, जिल्हा प्रशासन (District Administration), महापालिका (Dhule Municipal Corporation) आणि पोलिस (police) यंत्रणा घाम गाळत असताना धुळे शहरात मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडसह काही प्रमुख भागात गर्दीचा (large crowd) महापूर दिसून आला. त्यामुळे अनेक मार्ग बंद होऊन वाहतूक विस्कळित झाली. या स्थितीपुढे पोलिसांनीही हात टेकले. यात नियमांचे (rules) उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना पोलिस वाहनातून नेत कारवाईचा बडगा उगारण्यात आला. (dhule city lots people crowd streets)

हेही वाचा: पैसे दुप्पटीच्या आमिष..सहा वर्षात वृध्दाला ३३ लाखांचा गंडा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यूदरामुळे शासनाने संचारबंदीसह लॉकडाऊन लागू केले आहे. यात केवळ सकाळी सात ते अकरापर्यंत जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी परवानगी आहे. नंतर आरोग्य सेवा, मेडिकल दुकाने वगळता अन्य सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा आदेश आहे. ही संधी साधत नागरिकांनी शहरातील आग्रा रोडसह विविध भागात मंगळवारचा बाजार भरावा तशी गर्दी केली. या महापूरामुळे अनेक प्रमुख मार्ग रहदारीसाठी बंद झाले. ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली नियम पायदळी तुडवत अनेक व्यावसायिकांनी दुकाने उघडी ठेवली. या स्थितीमुळे हतबल पोलिसांनी सरतेशेवटी लाठ्या उगारत गर्दीला पांगविले. अनधिकृतपणे दुकान खुले ठेवणाऱ्यांचे व्यवसाय बंद केले. त्यामुळे गर्दी हटविण्यास मदत झाली.

हेही वाचा: मध्यप्रदेशात भीषण स्थिती..कोरोना रुग्णांची जळगावकडे धाव

हाॅकर्सची जत्रा..

महापालिकेने भाजीपाला विक्रेत्यांसाठी जागा निश्चित करूनही त्यांनी बेडरपणे पाचकंदील भागात व्यवसाय थाटला. पारोळा रोड, कराचीवाला खुंटावर नागरिकांसह हॉकर्सधारकांची जत्रा भरल्याचे चित्र होते. पायी चालण्यास जागा नव्हती. त्यामुळे अधिक प्रमाणात पोलिस रस्त्यावर उतरले. पोलिस निरिक्षक नितीन देशमुख, आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे, सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील, सैय्यद, कर्मचारी कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, मनोज पाटील, रवी इथापे आदींनी लाठ्या उगारत कारवाईला सुरवात केली. नंतर आग्रा रोडवरील गर्दी हटण्यास सुरवात झाली. साक्री रोडवरील गरुड व्यापारी संकुलाकडे मोर्चा वळवत पोलिसांनी नियमांचा भंग करणाऱ्या दुकानदारांना पोलिस वाहनातून ठाण्यात नेले. त्यांच्याकडून दंडवसुली, त्यास प्रतिसाद न देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय शहराचे पोलिस निरीक्षक देशमुख यांनी घेतला.

(dhule city lots people crowd streets)