esakal | पैसे दुप्पटीच्या आमिष..सहा वर्षात वृध्दाला ३३ लाखांचा गंडा

बोलून बातमी शोधा

 online fraud
पैसे दुप्पटीच्या आमिष..सहा वर्षात वृध्दाला ३३ लाखांचा गंडा
sakal_logo
By
रईस शेख


जळगाव : येथील एका निवृत्त कृषी सहाय्यकास (Retired Agricultural Assistant) इन्शुरन्स कंपनीचे (Insurance company) अधिकारी असल्याची बतावणी करून पैसे दुप्पट करण्याचे आमिष देत ३३ लाख २० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक (Online fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, फसवणूक झाल्याचा ताण सहन न झाल्याने त्यांचा मृत्यूही (Death) झाला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ( Jalgaon Cyber ​​police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश देवरे (रा. खोटेनगर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूनंतर मुलाने सखोल माहिती घेतल्यानंतर घटनेचा उलगडा झाला. (retired agricultural officer service online fraud death)

हेही वाचा: मध्यप्रदेशात भीषण स्थिती..कोरोना रुग्णांची जळगावकडे धाव

देवरे यांचे ८ मार्च २०२१ ला निधन झाले आहे. देवरे हे ममुराबाद येथील कृषी संशोधन केंद्रात सहाय्यक पदावर नोकरीस होते. २०१४ मध्ये देवरे यांना गौरव शर्मा व अग्रवाल (बनावट नावे) या तरुणांनी मोबाईलवर फोन करण्यास सुरवात केली. आपण ‘लाइफ प्लस इन्शुरन्स’ या कंपनीतून बोलत असल्याचे त्यांनी देवरे यांना सांगितले. या कंपनीच्या पॉलिसीत पैसे गुंतवल्यास चार वर्षांत दुप्पट रक्कम मिळेल, असे आमिष त्यांनी देवरेंना दिले. या आमिषांना बळी पडलेल्या देवरे यांनी सुरवातीला दोन लाख रुपये गुंतवले. त्यानुसार भामट्यांनी काही बनावट कागदपत्र पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर वेगवेगळी फी, खर्च या माध्यमातून भामट्यांनी वेळोवेळी पैशांची मागणी सुरूच ठेवली. तसेच भरलेली रक्कम चार वर्षांत दुप्पट होणार असल्याचा विश्वास त्यांनी देवरेंना करून दिला होता. भामट्यांच्या या आमिषांना बळी पडून देवरे यांनी फेब्रुवारी २०२१ म्हणजेच सुमारे सहा वर्षात भामट्यांना ऑनलाइनच्या माध्यमातून ३३ लाख २० हजार ७५२ रुपये पाठवले होते.

हेही वाचा: रोहिणी खडसेंचे चंद्रकांत पाटलांना आव्हान; तापी पुलाचा श्रेयवाद

दरम्यान, २०१३ मध्ये देवरे निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांना शासनाकडून मिळालेले पैसे त्यांनी भामट्यांना पाठवून दिले. पैसे भरल्यानंतर परत कधी मिळणार याची विचारणा त्यांनी वेळोवेळी केली होती. परंतु, भामट्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेली. फेब्रुवारी २०२१ मध्ये भामट्यांनी देवरे यांचा फोन घेणेदेखील बंद केले होते. दरम्यान, आपली फसवणूक झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देवरे हे धास्तीत गेले. पैशांच्या चिंतेत असताना ८ मार्च २०२१ ला त्यांचे निधन झाले. यानंतर कुटुंबीयांनी देवरे यांच्या काही पॉलिसींची माहिती घेतली असता त्यांच्या खात्यातून वेळोवेळी ३३ लाख रुपये ऑनलाइन पाठविण्यात आल्याचे समोर आले. देवरे यांनी तीन लाख रुपये गुंतवल्याची माहिती कुटुंबीयांना दिली होती. परंतु यानंतर त्यांनी पुढील पैसे गुंतवताना कुणालाही काही सांगितले नाही. परिणामी, कुटुंबीयांना देखील धक्का बसला. देवरे यांचा मुलगा सुनील यांनी या संदर्भात संपूर्ण माहिती गोळा केली असता वडिलांना कुणीतरी फसवल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुनील देवरे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव शर्मा व अग्रवाल (बनावट नावे) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(retired agricultural officer service online fraud death)