esakal | आखिर, बर्दाश्‍तकी भी हद होती है...! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

धुळे शहरात गेल्या पाच-सहा वर्षापासून १३६ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे, ही योजना कधी पूर्ण होईल हे यंत्रणेलाच माहीत. ही योजना धुळेकरांना नियमित पाणी देण्याऐवजी समस्याच जास्त घेऊन आली.

आखिर, बर्दाश्‍तकी भी हद होती है...! 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : शहरात भुयारी गटार, पाणी योजनांची कामे सुरू आहेत, पण या योजना पूर्ण होईपर्यंत जनतेचा जीव घेणार का असा प्रश्‍न उभा राहिला आहे. कचरा संकलन, अस्वच्छता, अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येनेही जनता हैराण आहे. या त्रस्त जनतेच्या तक्रारींची कुणी गांभीर्याने दखल घ्यायला तयार नाही. मात्र, बर्दाश्‍तकी भी हद होती है...या उक्तीप्रमाणे आता जनतेचाही संयम सुटत चालला आहे, विरोधकही सक्रिय झाले आहेत. समस्यांमुळे हैराण जनतेचा रोष ‘सकाळ'ने वारंवार मांडून यंत्रणेला जागे करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महापालिकेतील कारभारी (सत्ताधारी व प्रशासन) थोडेफार का होईना भानावर आल्याचे दिसते. त्यांनी भानावरच राहावे अशी अपेक्षा असेल. 

धुळे शहरात गेल्या पाच-सहा वर्षापासून १३६ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे, ही योजना कधी पूर्ण होईल हे यंत्रणेलाच माहीत. ही योजना धुळेकरांना नियमित पाणी देण्याऐवजी समस्याच जास्त घेऊन आली. या योजनेचे तीनतेरा वाजवण्यात खरे दोषी कोण हे मात्र अद्यापही कोडेच आहे. दरम्यान, आता शहरातील देवपूर भागात १३१ कोटीच्या मलनिस्सारण योजनेचे (भुयारी गटार) काम सुरू आहे. या दोन्ही योजनांमुळे देवपूरमधील साधारण सर्वच रस्ते खोदले गेले. कोरोनाचे संकट आल्याने कामाला ब्रेक लागला खरा पण या संकटापेक्षाही या भागातील रहिवाशांना रस्त्यांच्या दुरवस्थेने पुरते हैराण करून सोडले आहे. खोदलेल्या रस्त्यांची वेळेवर दुरुस्ती न झाल्याने, चालढकल केल्याने नागरिकांचा रोष वाढला. त्या भागातील नगरसेवकांनीही हा विषय वारंवार मांडला पण तो कुणी गांभीर्याने घेतला नाही. 

कचऱ्याचा प्रश्‍नाकडेही डोळेझाक 
शहरातील कचरा संकलन, अस्वच्छतेचा प्रश्‍नावर तक्रारी होत असतांना, डोळ्यांना दिसत असतांना महापालिकेतील कारभाऱ्यांनी या प्रश्‍नाकडेही साफ डोळेझाक केल्याचे पाहायला मिळाले. अनियमित पाणीपुरवठ्याची समस्याही अशीच दुर्लक्षित झाली. सार्वजनिक शौचालयांचा प्रश्‍नही तेवढाच गंभीर आहे. या समस्यांवर सत्ताधारी नगरसेवकच घरचा आहेर देत असताना शांतता कशी हाही मोठा प्रश्‍न आहे. 

रेटा वाढल्यानंतर आली जाग 
शहरातील या समस्यांप्रति जनतेचा रेटा वाढल्याने व आता विरोधकांनीही महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याने महापालिकेचे कारभारी आता जागे झाल्याचे पाहायला मिळत आहे. पर्यायाने प्रशासनही भानावर येत आहे. त्यामुळे बैठकांचे सत्र सुरू आहे. ठेकेदारांना तंबी देणे, नोटिसा बजावण्याची कार्यवाही सुरू आहे. 

तर केव्हाही विस्फोट 
महापालिकेतील कारभाऱ्यांनी शहरातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या हे बरेच झाले. पण, ही हालचाल थातूरमातूर, देखावा म्हणून असेल तर ती मोठी चूक ठरेल. कारण, धुळेकर नागरिकच नव्हे तर त्या-त्या भागातील सत्ताधारी नगरसेवकही पुरते हैराण आहेत, त्यामुळे कधी विस्फोट होईल सांगता येत नाही. 
 
भित्रेपणा सोडवा लागेल 
शहरातील काही समस्या या हिस्सेदारी, भागीदारीच्या भानगडीमुळे सुटत नसल्याचे चित्र आहे. संबंधित भागीदारांना कुणी बोलायची हिम्मतच दाखवत नसल्याने समस्या वाढल्याची चर्चा आहे. हा धाक व दहशत मोडून काढण्याची धमक कुणाला तरी दाखवावी लागेल अन्यथा जनता अशा ‘भित्रेपणा‘वर भविष्यात हसल्याशिवाय राहणार नाही हेही तेवढेच खरे. 

संपादन ः राजेश सोनवणे


 

loading image