धुळ्यात सायबर क्राईमवर पोलीसांची राहणार करडी नजर; ती कशी मग वाचा !

निखील सुर्यवंशी
Monday, 4 January 2021

सोशल मीडियावरुन भावना दुखावणे, सामाजिक, राजकीय, भाषिक, प्रांतिक तेढ निर्माण करणे, बदनामी करणे अशा स्वरूपाचे गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल होतील.

धुळे ः नववर्षाचे स्वागत करत येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाने सायबर पोलीस ठाणे कार्यान्वित केले. तत्पूर्वी, ते धुळे तंत्रज्ञानयुक्‍त गुन्हे अन्वेषण केंद्र होते. सायबर पोलीस ठाण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी दिली. 

येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, दहा पोलीस कर्मचाऱ्यांची यांची नियुक्‍ती झाली. दाखल गुन्ह्यांमध्ये अशी कार्यवाही होईल ः- माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अन्वये दाखल तांत्रिक गुन्ह्यांमध्ये आरोपी सज्ञान आहे आणि पोलीस ठाणे पातळीवर आरोपी निष्पन्न करणे शक्‍य नाही, असे तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट असणारे गुन्हे सायबर पोलीस ठाणे हाताळेल. स्थानिक पोलीस ठाण्याला दाखल गुन्ह्यांमध्ये आवश्यकता असल्यास सायबर पोलीस ठाण्याकडून तांत्रिक मदत व मार्गदर्शन केले जाईल. 

सायबर गुन्हे असे 
सायबर पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे ः- फसवणूक, इन्स्टाग्राम, ट्युटरवरुन ओळख चोरी करून किंवा हॅकींगव्दारे अश्लील मजकूर पोस्ट करणे, एटीएम- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डसंबंधी फसवणूक, फोनव्दारे बॅंकेचे कार्ड, ओटीपीसंबंधी माहिती घेऊन ५० हजार रुपयांवरील गुन्हे, बनावट वेबसाइट, रॅनसम वेअर अटॅक, औद्योगिक ई-मेल फिशिंग, डॉस अटॅक (डिनायल ऑफ सर्व्हिस), 
सायबर खंडणी, सायबर दहशतवाद, चाईल्ड पोर्नाग्राफी, ऑनलाइन शॉपिंग संबंधित गुन्हे. 

स्थानिक अन्य ठाण्यात गुन्हे 
सोशल मीडियावरुन भावना दुखावणे, सामाजिक, राजकीय, भाषिक, प्रांतिक तेढ निर्माण करणे, बदनामी करणे अशा स्वरूपाचे गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल होतील. एटीएम- डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डसंबंधी फसवणूक, फोनव्दारे बॅंकेचे कार्ड, ओटीपीसंबंधी माहिती घेऊन ५० हजार रूपयांआतील गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल होतील. ज्या गुन्ह्यांमध्ये फिर्यादीने स्वतः आरोपीच्या खात्यावर पैसे भरले असतील असे गुन्हे, तसेच ५० हजार रूपयांआतील एटीएम कार्ड क्लोनिंगचे गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल होतील. या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे मदत करेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule city police start cyber crime office