धक्कादायक : रेशन प्रकरणी क्‍लिप व्हायरल झाल्याने तरूणाची आत्महत्या

sucide
sucide

पिंपळनेर (जि. धुळे) : रेशन धान्याचा काळाबाजार होत असल्याची तक्रार आणि "क्‍लिप व्हायरल' झाल्यावर पितापुत्रावर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तसेच पुरवठा विभागाने तहसिल कार्यालयाच्या अहवालानुसार संबंधितांचा रेशन दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला. या धक्‍क्‍याने संशयित तरूणाने विष प्राशनातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. "क्‍लिप व्हायरल' करणाऱ्याला अटक होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन आणि अंत्यसंस्काराला पीडित कुटुंबाने विरोध दर्शविला आहे.

या घटनेमुळे धुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणा पेचात सापडली आहे. मृत तरूणाच्या बहिणीने फिर्यादीत म्हटले आहे, की माझा भाऊ अमोल अशोक मरसाळे (वय 29, रा. टेंभा रोड, रामनगर, पिंपळनेर, जि. धुळे) हा 16 एप्रिलला घरात ठेवलेली प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची 50 किलो रेशन तांदळाची गोणी मोटारसायकलने नेत होता. त्यावेळी काही व्यक्तींनी अमोलला पकडले व अपर तहसिलदारांकडे तक्रार केली. या कारणावरून तहसिल कार्यालयाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला आणि वडिल अशोक मरसाळे व भाऊ अमोलला अटक झाली. या प्रकाराची काही व्यक्तींनी व्हिडीओ क्‍लिप तयार केली. ती महेश वाघ उर्फ टिनूने त्याच्या मोबाईलवरून सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे अमोल तणावात आला. तो चार ते पाच दिवस घराबाहेर निघाला नाही. तसेच पाचव्या दिवशी घराबाहेर निघाल्यानंतर महेशने त्याला तुझी कशी जिरवली, अशी मस्करी केली. त्यामुळे अमोलने ही घटना त्याच्या पत्नीला सांगितली. घरातील सदस्यांनी अमोलची समजूत काढली. मात्र, तरीही तो अधिक तणावाखाली गेला. अशात पुरवठा विभागाने 6 मेस वडिल कारभार पाहात असलेल्या रेशन दुकानाचा परवाना कायमचा रद्द करण्याबाबत नोटीस पाठविली. त्यामुळे अमोल आणखी तणावाखाली गेला.
असे असताना बुधवारी (ता. 6) रात्री साडेदहाला घरी सर्व सदस्य जेवणासाठी एकत्र होते. तेव्हा अमोल अबोल होता. नंतर तो दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपण्यासाठी गेला. काही वेळानंतर अमोल काय करतोय हे पाहण्यासाठी गेल्यावर तो हात- पाय झटकत असताना दिसला. त्याच्या तोंडातून फेस येत होता. शेजारी विषारी औषधाची बाटली दिसली. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारावेळी मध्यरात्रीनंतर दीडला त्याला डॉक्‍टरांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी महेश उर्फ टिनूने सोशल मीडियाद्वारे व्हीडीओ क्‍लिप व्हायरल करून भाऊ अमोलचा छळ केला. तो त्याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार आहे, असे फिर्यादित नमूद आहे. त्यावरून पिंपळनेर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. महेशला अटक होत नाही तोपर्यंत ग्रामीण रूग्णालयाच्या शवविच्छेदन गृहातून अमोलचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका मरसाळे कुटुंबाने घेतली आहे. त्यामुळे सायंकाळी साडेसातपर्यंत ही स्थिती जैसे- थे होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com