coronavirus : इटली, दुबईहून धुळ्यात परतलेल्यांचे "नॉर्मल रिपोर्ट'

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

शहरासह जिल्ह्यात "कोरोना'विषयी घाबरण्याचे कारण नाही. स्थिती "नॉर्मल' आहे. शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. या आजाराविषयी भीतीही दूर करण्यात येत आहे. ठिकठिकाणी स्वच्छता पाळावी, थंडी- ताप, खोकला, घसा खवखवण्यासारखी लक्षणे दिसल्यास तत्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. 
- डॉ. राजकुमार सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा सर्वोपचार रुग्णालय 

 

धुळे : "कोरोना व्हायरस'च्या विदेशातून परतलेल्या दोन व्यक्तींची गेल्या काही दिवसात येथे वैद्यकीय व रक्त नमुन्यांची तपासणी झाली असून ते "नॉर्मल' असल्याचे स्पष्ट झाले. यात इटलीहून परतलेल्या तरुणीचा अहवाल पुणे येथील आरोग्य प्रयोगशाळेकडून प्राप्त झाला असून तोही "निगेटिव्ह' अर्थात "नॉर्मल' असल्याचे हिरे वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाने आज "सकाळ'ला सांगितले. 

हेपण पहा -व्हॉटस्‌ऍपच्या फोटोतल्या तिच्यासाठी त्याने दिले साडेचार लाख

"कोरोना'विषयी माहिती देण्यासाठी श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही नियुक्ती झाली आहे. इटलीमध्ये शिक्षणासाठी गेलेली येथील देवपूरमधील 23 वर्षीय तरुणी काही दिवसांपूर्वी धुळे शहरात आली. तिची चार दिवसांपूर्वी हिरे महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली. तिच्या शरीरातील काही नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्याचा अहवाल "निगेटिव्ह' आल्याने स्थिती घाबरण्यासारखी नाही. पंधरा दिवसांपूर्वीही देवपूरमधील रहिवासी असलेला तरुण दुबईहून परतला होता. विदेशातून आल्याने त्या तरुणाने स्वतः रुग्णालयात तपासणी करून घेतली. तो तरुणही काही दिवस डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली होता. त्याची प्रकृती चांगली असून "कोरोना'सदृश कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचाराची व्यवस्था असून अधिष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे, अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. निर्मलकुमार रवंदळे, डॉ. आशीष कांकरिया आदी डॉक्‍टरांचे पथक कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. 

रुग्णांसाठी माहिती कक्ष 
हिरे महाविद्यालयात "कोरोना'बाबत माहिती देण्यासाठी कक्ष सुरू झाला. महाविद्यालयातील बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. असंख्य रुग्ण व नातेवाईक महाविद्यालयासह रुग्णालयात येत असल्याने त्यांच्या मनात अनेक गैरसमज असतात. त्यांना योग्य माहिती मिळाल्यास भीती दूर होण्यास मदत होईल, योग्य ती काळजी घेऊन "कोरोना'सदृश आजारापासून स्वतःचे संरक्षण होईल, या उद्देशाने माहिती कक्ष सुरू झाला आहे. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule come two girls italy and dubai corona virus