साडे आठ कोटी रुपये खर्च करून पाण्याची टाकी बांधली. पाणी भरताच ती लागली गळायला !

भरत बागुल
Monday, 5 October 2020

टाकी पाण्याने भरली असता चहूबाजूने पाणी खाली पडत होते, टाकी संपूर्णपणे गळताना दिसून येत आहे हे १ लाख ३५ हजार लीटर टाकी एका दिवसात खाली झाली.

पिंपळनेर : शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या ८ कोटी ७२ लाखाच्या काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उदाहरण पाण्याच्या टाकीच्या रूपाने समोर आले आहे. मराठी शाळेजवळ १३५००० लीटर क्षमतेच्या पाण्याची टाकी संपूर्णपणे गळकी आहे. झालेल्या कामाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी होणे गरजेचे आहे.

वाचा- मुलाची केक कापण्याची तयारी; इतक्‍यात सिलेंडरचा भडका

पिंपळनेर शहरासाठी पुढील पंचवीस वर्षाचे नियोजन गृहीत धरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने भाजप-शिवसेना सरकारच्या काळात ८ कोटी ७२ लाख ७८७१४ रुपयांची योजना मंजूर केली. गाजावाजा करून या योजनेचे काम सुरू करण्यात आले. या योजनेमुळे पिंपळनेरकर नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे स्वप्न दाखवण्यात आले. या योजनेतून गावात चार ठिकाणी पाण्याची टाकी नवीन बांधकाम घेण्यात आलेले आहे. त्यात मराठी शाळा मुलांची याच्याजवळ उभारण्यात आलेली १३५००० लीटर क्षमतेची ६६ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. परंतु या टाकीचे कामकाज अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उदाहरण समोर आले आहे.

टाकी पाण्याने भरली असता चहूबाजूने पाणी खाली पडत होते, टाकी संपूर्णपणे गळताना दिसून येत आहे हे १ लाख ३५ हजार लीटर टाकी एका दिवसात खाली झाली त्यामुळे या टाकीचे काम किती चांगले झाले आहे हे दिसून येत आहे अजून अशा तीन टाक्या निर्माण करायचे असून संपूर्ण गावाची जलवाहिनी व योजनेची इतर कामे सुरू असून या कामांचा दर्जाही तपासणे गरजेचे आहे. या बांधकामाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

आवर्जून वाचा- घरगुती वापराचे चक्क २१ हजार बिल; नगरसेवक उतरले रस्‍त्‍यावर

बांधकामाच्या चौकशीची मागणी 
शहराची लोकसंख्या जवळपास ५० हजारपेक्षा जास्त असल्याने पाण्याची अडचण निर्माण होते. दररोज ४० लीटर प्रति मानसी क्षमतेच्या पाण्यासाठी २८३८ रुपये इतका खर्च शासनाने गृहीत धरलेला आहे. परंतु झालेले कामकाज पहाता हा खर्च पाण्यात, तर जाणार नाही ना असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. या कामाची गुणनियंत्रण विभागाने त्वरित चौकशी करावी व संबंधित दोषींविरोधात कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule construction of water tank eight crore but water filled up and started leaking