नाले वाहताय धो- धो पण शेतमाल वाहून नेण्यास अडचण

विनोद शिंदे
Friday, 9 October 2020

कुसुंबासह धुळे तालुक्यात पर्जन्यमान जास्त झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. तसेच पावसामुळे विहिरी तुडुंब भरल्या आहेत. गेल्या ३५ वर्षात कधी नाही ते वाहुन निघालेले नाले (ओढे) यावर्षी पाण्याने धो- धो वाहत आहेत.

कुसुंबा (धुळे) : कुसुंबा परिसरात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असल्याने पंचक्रोशीतील सर्वच नाले धो-धो वाहू लागले आहेत. पाऊस भरपुर असल्याचा शेतकऱ्यांना आनंद तर आहेच; मात्र नाल्यांमध्ये धो- धो वाहणाऱ्या पाण्यामुळे हाती आलेला खरीपाचा माल वाहुन नेण्यासाठी रस्ते नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
कुसुंबासह धुळे तालुक्यात पर्जन्यमान जास्त झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले आहे. तसेच पावसामुळे विहिरी तुडुंब भरल्या आहेत. गेल्या ३५ वर्षात कधी नाही ते वाहुन निघालेले नाले (ओढे) यावर्षी पाण्याने धो- धो वाहत आहेत. शेतशिवारांत जिकडे नजर टाकली तिकडे नाल्यांमध्ये पाणीच -पाणी दिसुन येत आहे. 

माल वाहून नेण्यासाठी अडचण
चित्र रब्बीसाठी समाधान कारक असतांनाच हाती आलेला खरीपाचा शेतमाल वाहुन नेण्यासाठी रस्ते नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना एक ते दोन किमी अंतरावर वाहुन न्यावा लागत आहे. तर काही शेतकरी गरजेनुसार स्वखर्चाने रस्ता तयार करून घेत आहेत. परिसरातील लेंडी, बोऱ्हाटी, बुरखड्या, हिरासन, खाऱ्या, लोंढा आदी नाले आहेत. तर काही ठिकाणी अक्कलपाडा धरणातून आलेल्या सय्यदनगर कालव्याला जोडलेल्या उपपाटचाऱ्या आहेत. गेल्या काही वर्षापुर्वी असे पाऊसच होत नसल्याने नाल्यांमधून रस्ते तयार झाले होते. त्यातुन मार्ग काढत शेतकरी आपला शेतमाल घरी आणत असत; मात्र या वर्षी साऱ्याच नाल्यांमधून धो- धो पाणी वाहत आहे. या पाण्याचा रब्बीसाठी फायदा आहेच; मात्र पाण्यामुळे रस्ते नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होतांना दिसून येत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule continue rain drop and drainage flow