धुळ्यात "कोरोना'चे रुग्ण; इतर आजाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय

निखिल सूर्यवंशी
Saturday, 6 June 2020

केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविड व नॉन- कोविड हे दोन्ही रुग्णालये पूर्ण स्वतंत्रच असावेत. त्यामुळे जिल्ह्यात सोमवारपासून (ता. 8) भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालय केवळ कोविड म्हणजे "कोरोना'शी संबंधित रुग्णालय म्हणूनच राखीव असेल,

धुळे : "कोरोना'शी संबंधित रुग्णांवर चक्करबर्डीतील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात, तर इतर सर्व आजारांच्या रुग्णांवर साक्री रोडवरील मोराणे शिवारातील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या "एसीपीएम' महाविद्यालय व संलग्न रुग्णालयात उपचाराचा मोठा निर्णय आज घेतला. सोमवारपासून (ता. 8) ही सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे हिरे महाविद्यालयावरील भार कमी होण्यास मदत होऊ शकेल. या रूग्णालयावर धुळे, नंदुरबार, जळगाव, मालेगाव, सटाणासह नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्‍यांचा भार असतो.

क्‍लिक करा - भय इथले संपत नाही...जिल्ह्यात वीस पटीने वाढ

दोन महिन्यांपासून भिजत पडलेला प्रश्‍न जिल्हाधिकारी संजय यादव, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, महापालिका आयुक्त अजीज शेख, जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या संचालक डॉ. ममता पाटील, प्राचार्य डॉ. विजय पाटील, "आयएमए'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर, "आयएमए'च्या जिल्हाध्यक्षा डॉ. जया दिघे, हिरे महाविद्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, "सिव्हिल'चे कोविड नोडल ऑफिसर डॉ. विशाल पाटील यांनी आज संयुक्त बैठकीत सोडविला.

सोमवारपासून सुविधा
केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार कोविड व नॉन- कोविड हे दोन्ही रुग्णालये पूर्ण स्वतंत्रच असावेत. त्यामुळे जिल्ह्यात सोमवारपासून (ता. 8) भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालय केवळ कोविड म्हणजे "कोरोना'शी संबंधित रुग्णालय म्हणूनच राखीव असेल, या ठिकाणी फक्त "कोरोना'शी संबंधित रुग्णांवरच उपचार केले जातील, तर साक्री रोडवरील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या "एसीपीएम' महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात इतर सर्व आजाराच्या रुग्णांवर उपचार होतील, असा निर्णय जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या अध्यक्षतेखालील संयुक्त बैठकीत झाला.

विविध सोयीसुविधा उपलब्ध
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात सुसज्ज आयसीयू विथ व्हेंटिलेटर्स, ऑक्‍सिजन व्यवस्था, सीटी स्कॅन, एक्‍सरे, सोनोग्राफी आदी सोयी-सुविधा उपलब्ध असतील. साक्री रोडवरील मोराणे शिवारातील अण्णासाहेब चुडामण पाटील स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व त्याचे रुग्णालयात हे फक्त "नॉन कोविड' रुग्णालय म्हणून कामकाज करेल. तेथे सर्व प्रकारचे नॉन कोविड रुग्ण म्हणजेच कोरोनाचे रुग्ण वगळून इतर सर्व आजाराच्या रुग्णांची तपासणी व त्यांना दाखल केले जाईल.

"एसीपीएम'मध्ये अन्य उपचार
सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सापळे यांनी सांगितले, की सोमवारपासून ज्या रुग्णांना ताप, खोकला अशी कोविडसदृश लक्षणे असतील किंवा जे नागरिक कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आले असतील, अशा नागरिकांनी चक्करबर्डीतील हिरे मेडिकल कॉलेजच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात तपासणी व औषधोपचारासाठी यावे. ते वगळून इतर प्रकारच्या सर्व आजारांसंबंधी तपासणी व औषधोपचारासाठी संबंधित रुग्णांनी थेट साक्री रोडवरील मोराणे शिवारातील जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या अण्णासाहेब चुडामण पाटील स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जावे. यासंदर्भात डॉ. दीपक शेजवळ समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona and other patient special hospital desision