कोरोनाचा परिणाम; बांधकाम क्षेत्राला सातशे कोटींचा फटका !

निखील सूर्यवंशी
Friday, 24 July 2020

लॉकडाउनमुळे स्लॅबची कामे थांबल्याने विविध साहित्याचा उठाव झाला नाही. ज्यांनी लॉकडाउनपूर्वी बांधकाम परवानगी घेतली, त्यांनी ५ जूननंतर गरजेप्रमाणे कामे सुरू केली आहेत.

धुळे  : महापालिका क्षेत्रात कोरोनामुळे २२ मार्च ते ५ जूनपर्यंत लॉकडाउन होते. या कालावधीत बांधकाम क्षेत्राला सुमारे सातशे ते आठशे कोटी रुपयांचा फटका बसला. काही साहित्याच्या दरवाढीमुळे ग्राहकांनी पाठ फिरविली, तर काही ठिकाणी साहित्य असूनही ग्राहक नसल्याने उलाढाल ठप्प झाली. ५ जूननंतर अटी-शर्तीनुसार लॉकडाउन शिथिल झाल्याने काहीसा उठाव आला, तरी अपेक्षित उलाढाल होत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. 

टीडीआर, तसेच वाढीव एफएसआय मिळाल्याने बांधकाम क्षेत्राला ऊर्जितावस्था मिळण्याचे चिन्ह होते. मात्र, काही दिवसांत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील उलाढालीवर विपरीत परिणाम झाला. लॉकडाउन काळात १०० टक्के उलाढाल ठप्प झाली. लॉकडाउनमुळे ग्राहकांसह कामगारांची अडचण, साहित्याच्या वाहतूक पुरवठ्याची समस्या, काही ठिकाणी साहित्य उपलब्ध मात्र ग्राहक नाही. प्रत्येक टप्प्यावर बांधकाम क्षेत्राला अडीअडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अर्थकारणावर परिणाम झाला.

 

मार्चएंडमुळे शासकीय पातळीवरची बांधकामे पूर्ण करण्यावर भर असतो. बिले मार्गी लावायची असतात. त्यामुळे जानेवारीपासून मार्चपर्यंत बांधकाम साहित्याच्या दरात काहीशी वाढ होते. ती यंदाही झाली. सिमेंट, स्टील, टाइल्सचा व्यवसाय थांबला. लॉकडाउनमुळे स्लॅबची कामे थांबल्याने विविध साहित्याचा उठाव झाला नाही. ज्यांनी लॉकडाउनपूर्वी बांधकाम परवानगी घेतली, त्यांनी ५ जूननंतर गरजेप्रमाणे कामे सुरू केली आहेत. बांधकाम साहित्य उपलब्ध होऊ लागले आहे. प्लंबिंगसह विविध साहित्याला मागणी वाढली आहे. किरकोळ दुरुस्तीपासून ज्यांची बांधकामे अपूर्ण होती, त्यांना मजूर मिळू लागल्याने त्यांनी कामाला वेग दिला आहे. काही प्रमाणात वाळू उपलब्ध होत आहे. ज्या व्यावसायिकांची विक्रीयोग्य बांधकामे झाली आहेत. त्यांनी सवलतीच्या दरात विक्रीचा प्रयत्न सुरू केला. मात्र, अद्याप अपेक्षित गती व उठाव मिळालेला नाही. 

देवपूरमधील प्रथम डिस्ट्रिब्यूटर्सचे संचालक श्‍याम कढरे यांनी सांगितले, की लॉकडाउनपूर्वी सर्वसाधारण प्रती ५० किलो सिमेंटच्या गोणीचे दर २५० रुपये होते. मार्चनंतर ते ३५० रुपयांवर पोचले. सद्यःस्थितीत सरासरी ३२० ते ३५० रुपयांना गोणी विक्री होत आहे. इतर साहित्याची मागणी वाढत आहे. 

तीन महिन्यांनी ऊर्जितावस्था 
व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन बंग यांनी सांगितले, की बांधकाम क्षेत्राला दोन ते तीन महिन्यांनी ऊर्जितावस्था येईल, अशी आशा आहे. पाऊस चांगला होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा येईल. त्यावर धुळे शहरासह जिल्ह्याचे ८० टक्के अर्थकारण अवलंबून आहे. त्यावरही बांधकाम क्षेत्रातील उलाढाल अवलंबून आहे. पुढे कोविडबाबत स्थिती सुधारली, तर तीन महिन्यांत आलेली सरासरी सातशे ते आठशे कोटींची तूट टप्प्याटप्प्याने भरली जाऊ शकते.  

 संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Corona effect construction sector hit by Rs 700 crore