esakal | चांगलचं झालं..."कोरोना'चा धाक नसलेल्या धुळेकरांना पोलिसांनी वठणीवर आणलं ..! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule police

विनाकारण "स्टाइल' मारत आणि "आम्हाला काहीच होणार नाही' या भ्रमात हिंडणाऱ्यांना चांगला चोप देऊन धुळे पोलिसांनी आज वठणीवरच आणले. 

चांगलचं झालं..."कोरोना'चा धाक नसलेल्या धुळेकरांना पोलिसांनी वठणीवर आणलं ..! 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविध उपाययोजनांसाठी शक्ती एकवटली आहे. गर्दी टाळावी, एकमेकांच्या संपर्कात कमी यावे यासाठी नागरिकांची मानसिकता तयार करण्यातही सरकार गुंतले आहे. त्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. तरीही विनाकारण "स्टाइल' मारत आणि "आम्हाला काहीच होणार नाही' या भ्रमात हिंडणाऱ्यांना चांगला चोप देऊन धुळे पोलिसांनी आज वठणीवरच आणले. 

"कोरोना' बाधित क्षेत्रातील नागरिकांना जिल्हा प्रवेश बंदी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या चौफेर सिमानाके "सील' झाले आहेत. तेथे पोलिस गस्त ठेवून आहेत. गुजरात, मध्य प्रदेशलगत जिल्हा आणि नाशिक, पुणे, मुंबईकडे स्थलांतरित धुळेकरांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव मुक्कामासाठी धुळ्याची निवड केली आहे. यासह विदेशातून सुमारे वीस हजार नागरिक धुळ्यात आल्याने जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना नाही म्हटला तरी ताण वाढला आहे.
 
हिंडणाऱ्यांना यंत्रणाही वैतागली 
अशा व्यक्ती गावात, कॉलनीत, घराजवळ दिसल्यानंतर अस्वस्थ नागरिकांकडून सरकारी यंत्रणेकडे तक्रारी होत आहेत. हा ताण सांभाळा, शिवाय ज्यांना "होम क्‍वारंटाईन' केले, तेही बिनधास्त बाहेर फिरत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशा मागणीप्रत आरोग्य, स्वच्छता आणि महापालिकेची यंत्रणाला आली आहे. हा भार निस्तारत नाही तोपर्यंत संचारबंदी लागू झाल्याने नागरिकांनी बाहेर निघू नये, असे अपेक्षित असताना आज (मंगळवारी) सकाळी भाजीपाला व विविध साहित्य खरेदीसाठी शहरात ठिकठिकाणी गर्दी उसळली. पेट्रोलपंपावरही रांगा दिसल्या. फळभाजी विक्रेते, किराणा दुकान खुले होते. तेथे खरेदीसाठी गर्दी झाली. 

गर्दीला हरताळ, पोलिस रस्त्यावर 
मुळात गर्दी टाळण्याच्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याने पोलिसांनी सकाळी साडेदहा ते अकरापासून खाक्‍या दाखविण्यास सुरवात केली. वर्दळीच्या देवपूरमधील दत्तमंदिर, झेड. बी. पाटील महाविद्यालय, नेहरू चौक, गांधी पुतळा, पारोळा रोड, चाळीसगाव रोड, मालेगाव रोड, साक्री रोड आदी चौफेर पोलिसांची पथके तैनात झाली. त्यांनी विनाकारण हिंडणाऱ्या तरुणांसह प्रौढांना चांगला चोप दिला. काही कुटुंबांना माघारी परतवले. काही नागरिकांना उठाबशा काढायला लावल्या. काही वाहनांची हवा काढली. ज्यांना वैद्यकीय मदतीची गरज होती, त्यांना पोलिसांनी साहाय्य केले. राज्यात "कोरोना' पाय पसरत असताना बेफिकीर धुळेकरांना वठणीवर आणणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत झाले. 

loading image