मालमत्ता कराची तिजोरी "निम्मी' रिकामी! 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

मालमत्ता कर व पाणीपट्टी महापालिकेच्या प्रमुख आर्थिक स्त्रोतांपैकी एक आहे. त्यातही धुळे शहरात पाणीपट्टीवर होणारा खर्च आणि वसूल होणाऱ्या पाणीपट्टीत जमीनअस्मानाचे अंतर आहे.

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाने साधारण सर्वच संस्थांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्याला महापालिकाही अपवाद नाही. मालमत्ता कर, पाणीपट्टीच्या रूपाने मिळणारा पैसा "कोरोना'मुळे रोखला गेला आहे. चालू आर्थिक वर्षाची स्थिती पाहिली तर एप्रिलनंतर आजअखेर सरासरी साडेतीन कोटी रुपयांची वसुली झाली आहे. मागच्या वर्षी महापालिकेची हीच वसुली सहा कोटी रुपयांपर्यंत होती. 

मालमत्ता कर व पाणीपट्टी महापालिकेच्या प्रमुख आर्थिक स्त्रोतांपैकी एक आहे. त्यातही धुळे शहरात पाणीपट्टीवर होणारा खर्च आणि वसूल होणाऱ्या पाणीपट्टीत जमीनअस्मानाचे अंतर आहे. अर्थात पाणीपुरवठ्यावर वसुलीपेक्षा कितीतरी पट जास्त खर्च होतो. त्यामुळे मालमत्ता करावर अधिक भिस्त आहे. मालमत्ता कर वसुली करता-करता महापालिकेच्या यंत्रणेला नाकीनऊ येतात. त्यात पुन्हा "कोरोना'चे संकट ओढवल्याने "दुष्काळात तेरावा'...अशी स्थिती आहे. 

निम्म्यावर घट 
एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षात एप्रिल, मे व जून या तीन महिन्यात संपूर्ण कर भरणाऱ्या नागरिकांना सूट मिळते. त्यामुळे नाही म्हटले तरी बऱ्यापैकी वसुली होऊन महापालिकेची तिजोरी भरते. यंदा "कोरोना'ने मात्र या वसुलीवर पाणी फिरवले आहे. नागरिकांकडे पैसाच नाही, ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना "लॉक डाउन'मुळे कर भरण्यासाठी महापालिकेपर्यंत येता आले नाही. त्यामुळे मागील वर्षीच्या (2019- 1920) तुलनेत चालू आर्थिक वर्षात (2020-2021) निम्म्यावर कर वसुली घटली आहे. 

70 टक्के पैसा जमा 
दरम्यान, एप्रिल ते आजअखेर मालमत्ता कराच्या रूपाने महापालिकेच्या तिजोरीत साधारण तीन कोटी 54 लाख रुपये जमा झाले. यातील 70 ते 75 टक्के रक्‍कम "ऑनलाइन' व्यवहारांनी (ऑनलाइन बॅंकिंग, ऍप आदी माध्यमातून) जमा झाले आहेत. उर्वरित साधारण 25 ते 30 टक्के रक्कमेपैकी बहुतांश रक्‍कमदेखील धनादेशाद्वारे आली आहे. त्यामुळे अपवाद वगळता रोखीने व्यवहार झालेला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आकडे बोलतात... 
- शहरातील मालमत्ताधारक...........सुमारे 80 हजार 
- हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ताधारक...सुमारे 22 हजार 
- एकूण...................................सुमारे 1 लाख 2 हजार 

2019-20 ची स्थिती 
- मागणी..............57 कोटी 85 लाख 
- एप्रिलची वसुली...तीन कोटी सात लाख 39 हजार 
- मेची वसुली........दोन कोटी 99 लाख 43 हजार रुपये 
- एकूण वसुली.......28 कोटी 03 लाख रुपये (मार्चअखेरपर्यंत) 

2020-21 ची स्थिती 
- चालू मागणी......35 कोटी 82 लाख रुपये 
- एकूण मागणी.....68 कोटी 65 लाख रुपये 
- वसुली.............आजपर्यंत 3 कोटी 54 लाख 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona impact corporation tax not reveneu