"एसी केबिन'मधून मजुरीसाठी थेट शेतात! 

एल. बी. चौधरी
Tuesday, 9 June 2020

लाखो रुपये खर्चून इंजिनिअरिंग केले. पण शासकीय नोकरी मिळाली नाही. खासगी क्षेत्रात कमी पगारावर राबराब राबूनही पगार जेमतेम मिळतो. मोठ्या पॅकेजचे स्वप्न धुळीस मिळाले. हेही कमीच की काय म्हणून "कोरोना'मुळे जे होते तेही काम बंद झाले. शेवटी गावी येऊन शेतात काम करणे भाग पडले आहे. माझ्यासह अनेक इंजिनिअर मित्र मिळेल ते काम करीत आहेत. 
- अजहर शेख, सिव्हिल इंजिनिअर, सोनगीर, ता. धुळे 

सोनगीर : मुलगा इंजिनिअर आहे. पुण्याला जॉब करतो. पगार कमी असला तरी भविष्यात वाढेल. मग फ्लॅट वगैरे घेता येईल. आज थोड्या काटकसरीत राहावे लागेल पण भविष्यात सर्व सुरळीत होईल, या अपेक्षेने वडिलांनी माझा विवाह लावला. कोरोनामुळे आज मला शेतीत काम करावे लागत आहे. काय सांगणार आता वडिलांना..? विवाहित महिलेच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रियेने "लॉक डाउन'मुळे झालेली विदारकता स्पष्ट झाली आहे. 
"कोरोना'चा सर्वाधिक फटका औद्योगिक क्षेत्राला बसला असून, अनेक कंपन्या बंद पडल्या. पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी मोठ्या महानगरांत विविध कंपन्यांमध्ये नोकरी करणारे हजारो इंजिनिअर, आयटीआय झालेले व अन्य शिक्षित युवक गावाकडे परतले असून, त्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. शहरातील नोकरीत सुरक्षित भविष्य पाहणाऱ्या युवकांचा हिरमोड झाला. एवढेच नव्हे, तर मोठा हुंडा, मानपान देऊन प्रसंगी कर्ज काढून मुलींचे लग्न लावून देणाऱ्या वधुपित्यांचे काळीज मात्र तुटत आहे. 
कोरोनामुळे मोठ्या शहरांत विविध कंपन्यांमध्ये कामासाठी गेलेले हजारो युवक गावाकडे परतले आहेत. सुरवातीला बरेच जण घरीच बसून होते. मात्र, पुन्हा नोकरीवर रुजू होऊच याची शाश्‍वती नसल्याने अनेक युवक आता स्वतःच्या शेतासह अन्यत्र रोजंदारीने मजुरीसाठी जाऊ लागले आहे. यातील काही जण तर सपत्नीक शेतात जात आहेत. जे हात रोज हजार-दोन हजार रुपये रोज कमावत होते त्यांना आता दोनशे रुपयांसाठी शेतात दिवसभर राबावे लागत आहे. काही जण बांधकाम, वीटभट्टी, ट्रॅक्‍टर, वाहन दुरुस्ती, वीजपंप, पंखे दुरुस्ती व अन्य ठिकाणी मिळेल ते काम करीत आहेत. 

मजुरांच्या संख्येत वाढ 
तालुक्‍यातील कुशल-अकुशल कामगार, मजूर गावाकडे घरी परतल्याने शेतमजुरांची संख्या वाढली आहे. हजारो युवकांचा राजकारणात वापर करून घेऊनही स्थानिक राजकारण्यांनी औद्योगिक विकास केला नाहीच; पण साखर कारखाने, सूतगिरण्या बुडवून हजारोंना बेरोजगार करण्याचे काम केले. तालुक्‍यात मोठे औद्योगिक प्रकल्पच नसल्याने हजारो शिक्षित तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते, ही शोकांतिका कधी दूर होणार हाच खरा प्रश्‍न आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona impact engineer work for farm