खासगी रुग्णालये-महापालिकेत जुपली! 

निखिल सूर्यवंशी
Saturday, 1 August 2020

सरकारी यंत्रणा केवळ बेड तयार ठेवले आहेत, हे दाखविण्यासाठी आटापिटा तर करत नाही ना? कोरोनाचा एखादा रुग्ण क्रिटिकल झाला, तर कुणीही जोखीम पत्करायला तयार होत नाही.

धुळे : शहरातील खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवर उपचार बंधनकारक केले आहेत. मात्र, या आदेशाला खासगी रुग्णालये कितपत गांभीर्याने घेतील, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयांच्या अडचणी काय आणि कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी सरकार, महापालिका नेमके काय सहकार्य करणार, असा प्रश्‍न उपस्थित करत काही रुग्णालयांनी खासगी चर्चेतून कांगावा करण्यास सुरवात केली आहे. याउलट खासगी रुग्णालयांनी रुग्णांना माफक सुविधा पुरविणे आवश्‍यक असल्याची भूमिका आयुक्त अजिज शेख यांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली. 
संदर्भात खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय व्यावसायिकाने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले, की कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्न केले, तरी यात आवश्‍यक उपचारासाठी सोयीसुविधा पुरविल्या जाणार आहेत का? रुग्णांना रेमडेसिव्हिर, टॉसिलीझुमॅब ही महागडी इंजेक्शन, ऑक्सिजनचा साठा पुरविणार आहे का? सरकारी यंत्रणा केवळ बेड तयार ठेवले आहेत, हे दाखविण्यासाठी आटापिटा तर करत नाही ना? कोरोनाचा एखादा रुग्ण क्रिटिकल झाला, तर कुणीही जोखीम पत्करायला तयार होत नाही. क्रिटिकल रुग्णाला सरकारी रुग्णालयात पाठवावे लागते. मग बेड तयार ठेवून नेमका उपयोग काय? कोविडच्या रुग्णांवर उपचार केले, तरी भरमसाठ पैसे उकळले जातात, अशी नाहक बदनामी व तक्रारी केल्या जातात. त्याचा कामकाजावर परिणाम होतो, अशी खंत मांडली. 

मनपा आयुक्तांची भूमिका 
या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त शेख म्हणाले, की खासगी रुग्णालयात कोविडचे रुग्ण दाखल झाले, तरी सर्वच रुग्णांना रेमडेसिव्हिर, टॉसिलीझुमॅब इंजेक्शन लागत नाही. एखाद-दुसऱ्या रुग्णाला ते लागते. खासगी रुग्णालयाला या इंजेक्शनची गरज भासली, तर हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या देखरेखीत व शासनाच्या निर्देशानुसार मदतीसाठी पुढाकार घेतला जाईल. यासंदर्भात डॉ. सापळे यांच्याशी बोलणे झाले आहे. शहरात कोविडच्या रुग्णांची संख्या वाढली, तरी प्रकृती सुधारण्याचा दर सरासरी ७० ते ७५ टक्के आहे. खासगी रुग्णालयांना हा मुद्दा दुर्लक्षित करून चालणार नाही. खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना माफक व्यवस्था पुरवावी, त्यांच्याकडील ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधा पुरविणे अपेक्षित आहे. जनहितासाठी खासगी रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा. 

तक्रारी झाल्यावर कारवाई 
खासगी रुग्णालयांनी आदेशाचे पालन केले नाही, पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यास डिस्चार्ज दिला यांसह रुग्ण किंवा नातेवाइकांकडून महापालिकेकडे तक्रारी झाल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल. तरतुदीनुसार संबंधित रुग्णालयावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त शेख यांनी दिला.

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona patients no triatment private hospital