"कोरोना'च्या संकटात बचत गटांनी विकले अडीच लाखांचे "मास्क' 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

स्वस्त व दर्जेदार मास्क उपलब्ध करून देत या महिला कोरोनाच्या लढ्यातही एकप्रकारे योगदान देत आहेत. शिवाय संसाराच्या आर्थिक चक्रालाही हातभार लावला.

धुळे :"कोरोना'च्या संकटाने एकीकडे लोकांचा रोजगार हिरवला गेला, तर दुसरीकडे "कोरोना'च्या संकटातच रोजगाराची संधी शोधत शहरातील महिला बचत गटांनी कुटुंबाच्या आर्थिक गाड्याला हातभार लावला. "कोरोना'चा धोका टाळण्यासाठी सर्वच जण "मास्क' वापरत आहेत, हेरून मास्क बनविण्याचे कामच बचत गटांनी हाती घेतले आणि पाहता- पाहता तब्बल अडीच लाख रुपयांचे मास्क विकले. 

"लॉक डाउन'मुळे साधारण सर्वच उद्योग- व्यवसाय बंद पडले आहेत. अशा बिकट स्थितीत महापालिकेअंतर्गत बचत गटांच्या महिला स्वयंरोजगारातून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सोडवत आहेत. एकमेकांना सहकार्य करत शहरातील 10-15 बचत गट, वस्तीस्तर संघांनी एकत्र येत कॉटनचे दर्जेदार कापड योग्य दराने खरेदी केले. या कापडापासून शिलाई मशिनवर मास्कची निर्मिती सुरू केली. तुळजाई, दुर्गामाता, माऊली, संत रोहिदास, तेजस्विनी, इच्छापूर्ती गणेश आदी बचत गटांतील महिलांनी यात सहभाग घेतला. सुरवातीला महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, उपायुक्त गणेश गिरी आदींच्या उपस्थितीत महापालिकेच्या प्रवेशद्वारावर "मास्क' विक्री केंद्राचे उद्‌घाटन झाले. रोज शंभर- दोनशे मास्क विक्रीचे उद्दिष्ट निश्‍चित असताना "कोरोना'चा संसर्ग वाढतच गेल्याने नागरिकांसह नगरसेवक, लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात वाटण्यासाठी बचत गटांना "मास्क'ची ऑर्डर दिली. 

25 हजार मास्कची विक्री 
बचत गटांनी आतापर्यंत 25 हजारांहून अधिक मास्कची विक्री केली आहे. त्यातून अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. स्वस्त व दर्जेदार मास्क उपलब्ध करून देत या महिला कोरोनाच्या लढ्यातही एकप्रकारे योगदान देत आहेत. शिवाय संसाराच्या आर्थिक चक्रालाही हातभार लावला. या काळात महापालिकेने 51 बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून दिला. महापौर सोनार, आयुक्त शेख यांच्या हस्ते निधीचे वाटप झाल्याने फिरत्या भांडवलामुळे महिलांच्या हातांनाही काम मिळाले. बचत गटांच्या महिला या मास्कनिर्मिती- विक्रीबरोबरच कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या काळजीबाबतही जनजागृती करत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona pirede lady Self-help groups sell 2.5 lakh masks