esakal | पुणे, मुंबईत वाढते रुग्ण; धुळेकरांच्या काळजात धस्स... 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

धुळेकरांच्या काळजातही धस्स झाले आहे. या स्थितीमुळे चिंताक्रांत जिल्हा प्रशासनाने उद्यापासून (ता. 19) खासगी ट्रॅव्हल्स, बसेस, इतर वाहनांनी येणाऱ्या प्रवाशांची टोलनाका, इतर प्रवेश हद्दीवर तपासणी करण्याचा आदेश महापालिका, एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयास आज दिला. 

पुणे, मुंबईत वाढते रुग्ण; धुळेकरांच्या काळजात धस्स... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : चीनसह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने राज्यात शिरकाव केला. त्याचे पुण्यात 18, मुंबईत 7, तर राज्यात एकूण 41 हून अधिक रुग्ण आढळले. त्यामुळे पुणे, मुंबईतील असंख्य विद्यार्थी, स्थलांतरित कुटुंबांनी सुरक्षिततेसाठी पुन्हा धुळ्याकडे परतणे पसंत केले आहे. त्यामुळे धुळेकरांच्या काळजातही धस्स झाले आहे. या स्थितीमुळे चिंताक्रांत जिल्हा प्रशासनाने उद्यापासून (ता. 19) खासगी ट्रॅव्हल्स, बसेस, इतर वाहनांनी येणाऱ्या प्रवाशांची टोलनाका, इतर प्रवेश हद्दीवर तपासणी करण्याचा आदेश महापालिका, एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयास आज दिला. 

क्‍लिक करा -  राज्यातील पहिले विद्यापीठ....कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना मिळतेय...

महापालिका प्रशासनाला आदेश 
जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले, की खासगी ट्रॅव्हल्स, एसटी बसेसने येणाऱ्या प्रवाशांची तपासणी थर्मल स्कॅनर यंत्राद्वारे झाली पाहिजे. खासगी ट्रॅव्हल्समधील प्रवाशांची महापालिकेने, तर एसटी बसेसने येणाऱ्या प्रवाशांची एका विशिष्ट ठिकाणी विभाग नियंत्रक कार्यालयाकडून तपासणी झाली पाहिजे. याअनुषंगाने उद्यापासून (ता. 19) ही कार्यवाही सुरू करा, अशी सूचना दिली आहे. 

पुण्यातून अनेक जण परतले... 
धुळे जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी, कुटुंबांनी पुण्यातही वास्तव्यास पसंती दिली आहे. पुणे, मुंबईत "कोरोना'चा धाक निर्माण झाल्यानंतर सुरक्षिततेसाठी अनेक विद्यार्थी, कुटुंबांनी धुळ्याकडे धाव घेतली. खासगी ट्रॅव्हल्स चालकांच्या मते आतापर्यंत बहुतांश विद्यार्थी, कुटुंबीय धुळ्यात परतले आहेत. आणखी दोन दिवस हा "फ्लो' राहील. मात्र, त्याचे प्रमाण कमी झाले आहे. ज्यांना धुळ्यात यायचे ते येऊन गेले आहेत. 
 
दरवाढीमुळे प्रवासी त्रस्त 
पुणे, मुंबईकडे खासगी ट्रॅव्हल्स, बसने परतणाऱ्या प्रवाशांची संख्या अत्यंत तुरळक आहे. ही संख्या कमी कमी होते गेली. त्यामुळे सरासरी दीडशे ते तीनशे रुपये भाडे आकारणी झाली. मात्र, मुंबई, पुण्याहून धुळ्याकडे येणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे काही ट्रॅव्हल्सचालकांनी प्रती व्यक्ती हजार ते अकराशे रुपये भाडे आकारले. प्रत्यक्षात काही ट्रॅव्हल्सचालकांनी सरासरी दोन ते तीन हजार रुपये भाडे आकारणी केल्याची, तर काही प्रवाशांनी दोन ते तीन हजार रुपये देऊ करत धुळे गाठणे पसंत केल्याची माहिती पुढे येत आहे. 

विदेशातील "टूर'धारकांचे काय? 
शहरासह जिल्ह्यातील काही नागरिक महिन्याभरात टूर- ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे विदेशात पर्यटनाला जाऊन आले. त्यांची माहिती कंपनीकडून घेतली जावी. संबंधित कंपन्यांचे कार्यालय धुळ्यातही आहे. याद्वारे माहिती संकलनानंतर त्यांची तपासणी केली जावी. जेणेकरून शंकेचे निरसन व संभाव्य धोके टळू शकतील, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. 
 
एसटी बसेसची तपासणी करू 
एसटीच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी सांगितले, की जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एसटी बसेसमधील प्रवाशांची थर्मल स्कॅनर यंत्राने तपासणी केली जाईल. नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाजात व्यस्त असल्याने धुळ्यात परतल्यावर नियोजन केले जाईल. बसेस तपासणीचे ठिकाण निश्‍चित करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. 
 
उपाययोजनांसाठी 40 लाख प्राप्त 
"कोरोना'च्या मुकाबल्यासाठी एक कोटीपैकी 40 लाखांचा निधी आज "बीडीएस'द्वारे प्रशासनाला प्राप्त झाला. त्यात थर्मल स्कॅनर मशिन, मास्क, कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची साधने, तात्पुरती चाचणी प्रयोगशाळा यासह विविध साहित्य, सुविधांची उपलब्धता केली जाईल. 
 
सॅनिटायझरचा मोठा तुटवडा 
"कोरोना'ला प्रतिबंधासाठी उपयुक्त सॅनिटायझरचा शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर होतो. त्याची बाटली सरासरी 80 ते 100 रुपयांपर्यंत मिळते. घरात लहान बाळ असेल तर सॅनिटायझर दिले जाईल, असे काही मेडिकल व्यावसायिक सांगतात. बहुतांश जणांकडे साठाच शिल्लक नाही. होलसेल विक्रेत्यांनी कंपन्यांकडे मागणी नोंदविली असली तरी पुणे, मुंबईत अधिक मागणी वाढल्याने जिल्ह्यात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाल्याचे मेडिकल दुकानदाराने सांगितले. तसेच मास्कचाही तुटवडा निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. 

loading image