धुळ्यात दुसरा डॉक्‍टर "पॉझिटिव्ह'

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

हिरे वैद्यकिय महाविद्यालयासह कार्यक्षेत्रातील जिल्हा सर्वोपचार रूग्णालयातील 38 वर्षीय निवासी डॉक्‍टर बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. देवपूरमधील या स्थितीमुळे नेहरू चौकातील मुख्य आग्रा रोड बंदीस्त होणार असल्याने दळणवळण खंडीत होण्याची शक्‍यता आहे.

धुळे : संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'ची लागण झालेला दुसरा डॉक्‍टर आज शहरात आढळल्याने खळबळ उडाली. "कोरोना'ने सरासरी दीड लाख लोकसंख्येच्या देवपूर भागात पाय पसरल्याने नागरिक चिंतेत आहेत. कोरोना बाधित शहरातील दुसरा डॉक्‍टर, तर देवपूरमधील दुसरा रूग्ण आहे. तत्पूर्वी, भाऊसाहेब हिरे वैद्यकिय महाविद्यालयासह कार्यक्षेत्रातील जिल्हा सर्वोपचार रूग्णालयातील 38 वर्षीय निवासी डॉक्‍टर बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. देवपूरमधील या स्थितीमुळे नेहरू चौकातील मुख्य आग्रा रोड बंदीस्त होणार असल्याने दळणवळण खंडीत होण्याची शक्‍यता आहे.

हेही पहा - नऊ महिन्याची गरोदर...341 किमीची पायपीट अन्‌ रस्त्यावर न पाहवणारे दृश्‍य ​

देवपूरसह धुळे शहरात आतापर्यंत 26, तर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 35 झाली आहे. यातही जिल्ह्यातील बाधित मृत सहा व्यक्ती वगळता कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 29 झाली आहे. सर्वाधिक धुळे शहरात 26, साक्रीत 4, शिंदखेडा तालुक्‍यात 3, तर शिरपूर तालुक्‍यातील 2 मिळून एकूण रूग्ण संख्या 35 झाली. पैकी धुळे शहरातील चार, तर साक्रीतील दोघांचा मृत्यू झाला. तसेच 29 पैकी 11 कोरोनामुक्त झाल्याने 18 रूग्ण उपचार घेत आहेत.

असे आहेत रूग्णांचे भाग
देवपूरमध्ये आज आढळलेला दुसरा कोरोना बाधित 50 वर्षीय डॉक्‍टर रूग्ण खासगी व्यावसायिक आहे. त्यांचे क्‍लिनिक आहे. देवपूरमधील नेहरू चौक परिसरातील जुने पोलिस स्टेशन व त्याठिकाणच्या तलाठी कार्यालय परिसरातील हा रूग्ण आहे. त्यापूर्वी देवपूरमधील नगाव बारी चौफुली परिसरातील एकता हौसिंग सोसायटीतील महिला नाशिक येथे पॉझिटिव्ह सापडली होती. तसेच धुळे शहरातील आझादनगर, स्नेहनगर, सहावी गल्ली परिसर बाधित झाल्याने प्रतिबंधीत आहे.

बाधित रूग्णाचा शोध सुरूच
दरम्यान, दादर- मुंबई येथून ट्रकने धुळेमार्गे उत्तर प्रदेशकडे जाताना झालेल्या अपघातातील 22 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह तरूण गरोदर पत्नी, चार वर्षांच्या मुलीसह परवा जिल्हा रूग्णालयातून पळून गेला. त्याचा अद्याप शोध लागलेला नाही. या मजूर कुटुंबाची शोधाशोध सुरू आहे. हिरे महाविद्यालय आणि जिल्हा सर्वोपचार रूग्णालयातून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेले 11 जण घरी परतले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corona virus second doctor positive