esakal | कोरोनाचे आठ-आठ दिवस रिपोर्ट नसल्याने जीव टांगणीला 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचे आठ-आठ दिवस रिपोर्ट नसल्याने जीव टांगणीला 

संशयित रुग्णांना साधारण आठ दिवसांत अहवाल मिळत असेल तर अशा अहवालांचा उपयोग काय? आठ दिवसांनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला तर मग आठ दिवसांनंतर उपचार सुरू करायचे का?

कोरोनाचे आठ-आठ दिवस रिपोर्ट नसल्याने जीव टांगणीला 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे/नंदुरबार ः तत्काळ शोध लागून कोरोनाबाधितांचे जीव वाचावेत, यासाठी शासन- प्रशासनाच्या पातळीवरून लक्षणे असल्यास चाचणी करून घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अनेक नागरिकांना पाच ते आठ दिवस अहवालच मिळत नसल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात आहे. त्यामुळे संशयित रुग्णांचा जीव टांगणीला आहे. कागदोपत्री पेंडिंग रिपोर्टची संख्या शून्य दाखविण्यात येत आहे. मात्र, धुळे जिल्ह्यात विलंबाने अहवाल देण्याची समस्या नसल्याचे अधिकारी म्हणतात. 

आवश्य वाचा- वडीलांचे ते शब्द भिडले हृदयाला; मग काय घर सोडले आणि रसवंतीवर करू लागला काम
  
कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांसह सर्वच लोकप्रतिनिधी, तसेच प्रशासकीय यंत्रणा नागरिकांना काळजी घेण्याबरोबरच लक्षणे आढळल्यास तत्काळ दवाखान्यात जा, चाचणी करून घ्या, असे आवाहन करीत आहेत. अशी सर्व तत्परता दाखविली जात असताना, दुसरीकडे कोरोना चाचणीसाठी नमुने दिलेल्या नागरिकांना अहवालासाठी अनेक दिवस जीव मुठीत धरून प्रतीक्षा करावी लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यात ही स्थिती गंभीर असल्याचे दिसते. 

किती दिवस करायची प्रतीक्षा 
लक्षणे असलेल्या नागरिकांनी तातडीने नमुने दिले खरे; पण लवकर अहवाल मिळत नसल्याने किती दिवस प्रतीक्षा करायची, असा प्रश्‍न आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात पाच-पाच, सहा-सहा दिवस झाले, तरी अनेक जणांना अहवालाची प्रतीक्षा आहे. आरोग्य विभागाकडे विचारणा केली तर अजून दोन दिवस लागतील, असे सांगण्यात आले. 

मग रिपोर्ट काय कामाचा 
संशयित रुग्णांना साधारण आठ दिवसांत अहवाल मिळत असेल तर अशा अहवालांचा उपयोग काय? आठ दिवसांनंतर अहवाल पॉझिटिव्ह आला तर मग आठ दिवसांनंतर उपचार सुरू करायचे का? दरम्यानच्या काळात संसर्गामुळे गुंतागुंत वाढली तर काय, असे अनेक प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहेत. शिवाय बाधिताच्या घरातील सदस्य, संपर्कातील लोकांचे (हाय रिस्क) काय, असाही प्रश्‍न आहे. 

कागदोपत्री पेंडिंग शून्य (नंदुरबार जिल्हा) 
- २५ नोव्हेंबरचा रिपोर्ट 
- संपूर्ण कोविड रुग्ण ... ६,२४२ 
- उपचार घेत असलेले ...२४८ 
- मृत्यू ... १५१ 
- बरे झालेले रुग्ण ... ५,८४० 
- स्वॅब घेतले... ३०,००१ 
- प्रलंबित रिपोर्ट ... ०० 

वाचा- अमृत’मुळे साडेपाच लाख जळगावकर वेठीस 


 
धुळ्यात विलंब नाही 
नंदुरबार जिल्ह्यात संशयित रुग्णांना पाच ते आठ दिवसांपर्यंत अहवालासाठी प्रतीक्षा करावी लागत असतानाच धुळे जिल्ह्यात मात्र अशी स्थिती नाही. नमुने घेतल्यानंतर जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसांत अहवाल दिला जातो. शिक्षकांची गर्दी झाल्यानंतरही यावर फारसा परिणाम झाला नसल्याचे धुळे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी सांगितले. मंगळवार (ता. २४)पर्यंत धुळे जिल्ह्यात एक हजार १७ रिपोर्ट पेंडिंग होते.  

loading image