esakal | धुळे जिल्‍हा : कोरोनाबाधितांसह बळींचा आलेख उतरला 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus death ratio

काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित व बळींचा आकडा कमी दिसत आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, कोविड केअर सेंटर्स येथे एकूण ३१० जणांचे नमुने तपासण्यात आले.

धुळे जिल्‍हा : कोरोनाबाधितांसह बळींचा आलेख उतरला 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोनाबाधितांसह बळींचा आलेख जिल्ह्यात पुन्हा खाली आल्याचे चित्र आहे. काल (ता.२७) बाधितांची संख्या ७१ होती, आज (ता.२८) यात पुन्हा घसरण होत बाधितांचा आकडा थेट ३६ वर आला. विशेष म्हणजे उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा व भाडणे साक्री कोविड केअर सेंटर या दोन ठिकाणच्या तपासणी अहवालांपैकी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. दरम्यान, जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा आज मृत्यू झाला. 

काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित व बळींचा आकडा कमी दिसत आहे. सोमवारी सायंकाळी साडेसातपर्यंत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, कोविड केअर सेंटर्स येथे एकूण ३१० जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यातील ३६ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले. यात एक बाधित पोलीस मुख्यालयातील आहे. दरम्यान, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथील ४० व भाडणे साक्री कोविड केअर सेंटर येथील २४, अशा एकूण ६४ पैकी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. नवीन ३६ बाधितांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १२ हजार २०८ झाली. सोमवारी जिल्ह्यातील बाधित असे- धुळे जिल्हा रुग्णालय (७८ पैकी ०७), दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय (४० पैकी ०), शिरपूर उपजिल्हा रुग्णालय (५८ पैकी ६, रॅपिड अँटीजन टेस्टचे ३ पैकी १), भाडणे- साक्री कोविड केअर सेंटर (२४ पैकी ०), महापालिका पॉलिटेक्नीक कोविड केअर सेंटर (६४ पैकी ६, रॅपिड अँटीजन टेस्टचे ३ पैकी ०), हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (१५ पैकी ४), खासगी लॅब (३१ पैकी १२). 
 
दोन बाधितांचा मृत्यू 
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यात जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पद्मनाभ नगर (साक्री रोड, धुळे) येथील ८४ वर्षीय पुरुषाचा व दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल लंघाणे (ता. शिंदखेडा) येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबळींची एकूण संख्या ३६१ झाली. यात धुळे महापालिका क्षेत्रातील १६०, तर उर्वरित जिल्ह्यातील २०१ मृतांचा समावेश आहे.