esakal | धुळ्यात नो मास्क, नो एन्ट्री 
sakal

बोलून बातमी शोधा

no mask no entry

दिवाळीनिमित्त बाजारपेठेत जाताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी. आगामी काळात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात बाजारपेठेत वर्दळ वाढेल. त्यामुळे साध्या पद्धतीने सण साजरा करावा.

धुळ्यात नो मास्क, नो एन्ट्री 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोना विषाणूच्या संसर्गाची रूग्णसंख्या कमी होताना दिसते आहे. मात्र, या विषाणूचे भय कमी झालेले नाही. त्यात दिवाळीसारखा सण असल्याने बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे. या स्थितीत कोरोनापासून बचावासाठी नो मास्क, नो एन्ट्री, असे जनजागृतीपर अभियान सुरू केल्याची माहिती पारोळा रोड व्यापारी संघटनेने दिली. मास्क विसरणाऱ्यास दुकानदार मास्क देईल आणि सुरक्षितता बाळगेल, अशी हमी संघटनेने दिली. 

कोरोना विषाणू आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व व्यापारी संघटनेची बैठक झाली. जिल्हाधिकारी संजय यादव अध्यक्षस्थानी होते. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, प्रांताधिकारी भीमराज दराडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट आणि व्यापारी महासंघाचे प्रवर्तक नितीन बंग, पारोळा रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाळ माने, प्रवीण रेलन, विकास देवभानकर, प्रशांत देवरे, राजेंद्र तनेजा, सुनील पंजाबी आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की दिवाळीनिमित्त बाजारपेठेत जाताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी. आगामी काळात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात बाजारपेठेत वर्दळ वाढेल. त्यामुळे साध्या पद्धतीने सण साजरा करावा. घराबाहेर पडताना मास्क आवर्जून वापरावा. दोन व्यक्तींमध्ये शारीरिक अंतर ठेवावे. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. व्यापाऱ्यांनीही सहकार्य करावे. शासनाने मिशन बिगेन अगेन सुरू केले आहे. त्यामुळे विविध आस्थापना सुरू झाल्या आहेत. नागरिकांनी एकाच वेळेस बाजारपेठेत गर्दी करू नये. व्यापाऱ्यांनीही दक्षता बाळगत ग्राहकांना मास्क वापरण्यास प्रवृत्त करावे. एकाच वेळेस दुकानात गर्दी होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी. तसेच नागरिकांनी वेळोवेळी हात साबण किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करावे. 

संघटनेनेही घेतला पुढाकार
मुख्य बाजारपेठेतील हॉकर्सची महापालिकेने रॅपिड अँटिजेन चाचणी सुरू करावी. सुरळीत वाहतुकीसाठी पोलिस विभाग, महापालिका आणि महसूल विभागाच्या सहकार्याने पथके कार्यरत करावी. त्यांनी गस्त घालून नियमांच्या पालनावर कटाक्ष ठेवावा. मास्क न वापरणे, शारीरिक अंतर न ठेवणाऱ्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करावी. पोलिस अधीक्षक पंडित यांनी वाहतूक सुरक्षा, आयुक्त शेख यांनी सहकार्याची ग्वाही दिली. पारोळा रोड व्यापारी संघटनेने नो मास्क, नो एन्ट्री अभियान राबवून जागृतीची हमी दिली. तसेच सतर्कचे आवाहन श्री. बंग, श्री. माने, श्री. रेलन यांनी केले.