esakal | बापरे...किती ही बेरोजगारी! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation.

देशभरात भावनिक मुद्यांवरून राजकारण करणारे राजकारण करतात, त्यातून तणाव, दंगली उद्‌भवण्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. या भावनिक राजकारणाच्या गोंधळात बेरोजगारीच्या भीषण वास्तवाकडे मात्र डोळेझाक होत असल्याचे पाहायला मिळते.

बापरे...किती ही बेरोजगारी! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर संगणक लिपीकपदाच्या 23 जागांसाठी आज उमेदवारांच्या मुलाखती होत्या. पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ही प्रक्रिया आजच पूर्ण करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न होता. प्रत्यक्षात या 23 जागांसाठी तब्बल 822 उमेदवारांची महापालिकेत गर्दी उसळली. या गर्दीच्या निमित्ताने बेरोजगारीच्या भीषण दाहकतेचे चित्र अधोरेखित झाले. 

देशभरात भावनिक मुद्यांवरून राजकारण करणारे राजकारण करतात, त्यातून तणाव, दंगली उद्‌भवण्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. या भावनिक राजकारणाच्या गोंधळात बेरोजगारीच्या भीषण वास्तवाकडे मात्र डोळेझाक होत असल्याचे पाहायला मिळते. बेरोजगाराची असेच वास्तव चित्र आज येथे महापालिकेतही पाहायला मिळाले. कुशल मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महापालिकेने सहा महिन्यांच्या करारावर संगणक लिपिक पदासाठी अर्ज मागविले. यात 23 जागांसाठी उमेदवारांना थेट मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. 

गर्दी उसळली 
संगणक लिपिक पदासाठी उमेदवारांची आज महापालिकेत गर्दी उसळल्याचे चित्र दिसले. 23 जागांसाठी तब्बल 822 उमेदवार अर्ज घेऊन आले. ही गर्दी पाहूनच प्रशासनाचे डोळे विस्फारले. त्यामुळे अर्ज जमा करण्यासाठी उमेदवारांना अक्षरशः रांगा लावाव्या लागल्या. अर्ज स्वीकारणे व आनुषंगिक कामासाठी प्रशासनाला अधिकचे मनुष्यबळ लावावे लागले. 

छाननीनंतर मुलाखती 
वास्तविक, आज उमेदवारांच्या थेट मुलाखती होत्या. प्रत्यक्षात उमेदवारांची गर्दी उसळल्याने प्रशासनाला ही प्रक्रिया बदलावी लागली. आता अर्ज स्वीकारल्यानंतर अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल, असे सांगण्यात आले. 
 
उच्च शिक्षितांचीही धडपड 
संगणक लिपिक पदासाठी पदवीधर व मराठी, इंग्रजी टायपिंग, एमएस- सीआयटी अशी पात्रता होती. प्रत्यक्षात मात्र बीई, बीसीए, एमए यासह विविध उच्च पदव्या धारण केलेले उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. धुळ्यासह नंदुरबार, नाशिक आदी विविध ठिकाणांहून उमेदवार मोठ्या अपेक्षेने आले होते. मुलींची संख्याही लक्षणीय होती. 
 
अशी आहे स्थिती... 
संगणक लिपिक पदासाठी दहा हजार रुपये मानधन असून सहा महिन्यांसाठी ही भरती आहे. दरम्यान, महापालिकेत यापूर्वीच 19 संगणक लिपिक कंत्राटी पद्धतीवर काम करत असून त्यातील काहींचा करार संपला आहे, तर काहींचा संपण्यात आहे. भरण्यात येणाऱ्या 23 जागांमध्ये या 19 कर्मचाऱ्यांनी अर्ज केल्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष भरतीत नेमक्‍या किती नवीन उमेदवारांना संधी मिळते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल.