धुळ्यात आयुक्‍तांनी लावले असे नियम...तोडले तर होणार कारवाई

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 July 2020

शहरात बहुसंख्य नागरिक, व्यावसायिक मास्क न लावणे, वाहनावर डबलसीट, शारीरिक अंतर न पाळणे यासह शासनाकडून सूचीत विविध नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास येते. या पार्श्वभूमीवर नियमांचे कठोरतेने पालन होण्यासाठी आणि स्थिती नियंत्रणासंदर्भात महापालिकेत प्रांताधिकारी भिमराज दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

धुळे : शहरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आणि लॉकडाउन शिथिल केल्यानंतर सम- विषम तारखेच्या सूत्रानुसार व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. या सूत्राचा भंग करणाऱ्या व्यावसायिकांवर नाइलाजाने फौजदारी, दंडात्मक कारवाई करावी लागेल, असा इशारा महापालिका आयुक्त अजिज शेख यांनी दिला. 
शहरात बहुसंख्य नागरिक, व्यावसायिक मास्क न लावणे, वाहनावर डबलसीट, शारीरिक अंतर न पाळणे यासह शासनाकडून सूचीत विविध नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास येते. या पार्श्वभूमीवर नियमांचे कठोरतेने पालन होण्यासाठी आणि स्थिती नियंत्रणासंदर्भात महापालिकेत प्रांताधिकारी भिमराज दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. आयुक्त शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, तहसीलदार संजय शिंदे, उपायुक्त शांताराम गोसावी, सहाय्यक आयुक्त विनायक कोते, पल्लवी शिरसाट तसेच सर्व झोनल अधिकारी, नियंत्रण अधिकारी उपस्थित होते. 
महापालिका हद्दीतील व्यापारी प्रतिष्ठाने व संस्था पाच जूनपासून सुरू करण्याबाबत निर्देश होते. कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव व शारीरिक अंतराचा निकष लक्षात घेऊन नागरिकांची अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी सम- विषय तारखेस दुकाने व व्यापारी संस्था विहित मुदतीत सुरू ठेवण्याबाबत निर्णय झाला. या अनुषंगाने नियमाचे काटेकोर पालन होण्यासाठी जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासतर्फे झोनल अधिकारी व नियंत्रण अधिकाऱ्यांचे पथक स्थापन झाले. त्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. तीत संबंधित अधिका-यांना येणा-या अडचणी समजावून घेण्यात आल्या. त्यामुळे नियम व वेळेचे पालन न करणा-या व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा आदेश बैठकीत देण्यात आला. 

गुन्हे दाखल करण्याचे निर्देश 
संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांचे छायाचित्र काढून पत्त्यासह अहवाल द्यावा. याबाबत कुणाचीही गय करू नये. संबंधितांवर दंडात्मक कार्यवाहीसह पोलिसांत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. मनपा प्रशासनाने पूर्वीच व्यापारी मॉल्स व व्यापारी संकुले वगळून सर्व दुकाने पी-१, पी- २ या तत्त्वानुसार सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंतच खुली ठेवण्याची सूचना दिली आहे. रस्ता, गल्ली, खुल्या जागेच्या पूर्व व दक्षिण दिशेला मुख्य प्रवेशव्दार असणारी दुकाने विषम तारखेला (उदा. १, ३, ५, ७, ९), तसेच पश्चिम व उत्तर दिशेला मुख्य प्रवेशव्दार असणारी दुकाने सम तारखेला (उदा. २, ४, ६, ८, १०) सुरू ठेवण्याची सूचना दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation commissioner rules corona virus unlock