ठेकेदाराच्या बदमाशीमुळे आरोग्य धोक्यात 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

शहरातील पारोळा रोडवरील गजानन कॉलनी, हमाल-मापाडी प्लॉट, वाखारकर नगर भागातून वाहणाऱ्या नाल्याला संरक्षक भिंत बांधण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या निधीतून ३ कोटी ८६ लाख मंजूर झाले. २०१८ मध्ये गाजावाजा करून या संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले.

धुळे : ठेकेदाराच्या बदमाशीमुळे गजानन कॉलनी, हमाल-मापाडी प्लॉट भागातील नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम बंद आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे काम लवकरात लवकर सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवशाही हिंदवी स्वराज्य संघटनेने दिला. 
शहरातील पारोळा रोडवरील गजानन कॉलनी, हमाल-मापाडी प्लॉट, वाखारकर नगर भागातून वाहणाऱ्या नाल्याला संरक्षक भिंत बांधण्यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या निधीतून ३ कोटी ८६ लाख मंजूर झाले. २०१८ मध्ये गाजावाजा करून या संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले. मात्र, गेल्या वर्षभरापासून काम अपूर्णावस्थेत बंद पडले आहे. मूळ ठेकेदाराने हे काम तीन-चार पार्टनर्सला दिले. मात्र, त्यांच्यात काही आर्थिक वाद झाले असावेत त्यामुळे हे काम ठप्प आहे. दुसरीकडे मूळ ठेकेदार कामाला हात लावायला तयार नाही असे संघटनेचे रजनीश निंबाळकर यांनी सांगितले. आत्तापर्यंत संरक्षक भिंतीचे ४० टक्के काम झाले आहे. सुमारे २ कोटींचा निधी बांधकाम विभागाकडे पडून आहे. हा निधी परत गेला तर काम अनेक वर्षे हे काम रखडेल, असेही संघटनेचे म्हणणे आहे. 

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ 
नाल्याच्या वरच्या भागातून सांडपाण्यासह दुर्गंधीयुक्त पदार्थ वाहून येतात. ते पाणी नागरी वस्तीमध्ये शिरते. त्यामुळे परिसरातील नागरिक नरकप्राय यातना भोगत आहेत. याच समस्येमुळे संरक्षक भिंतीची मागणी आहे. त्यामुळे हे काम लवकर सुरू करा, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडू, असा इशारा शिवशाही हिंदवी स्वराज्य संघटनेने दिला. मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एजाज शाह यांना दिले. श्री. निंबाळकर, मधुकर सूर्यवंशी, देवेंद्र भडागे, प्रशांत चौधरी, कार्तिक मराठे, विनोद रनमळे, मोहित कोळपे, सनी परमेश्वर साळवे, निखिल वाघ, पवन चौधरी, मोहन पथिक, आकाश सूर्यवंशी, नकुल रगडे, दीपक शेळके, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation contractor no work