अंत्यसंस्कारावेळी "ती' व्यक्ती ठरली बेवारस...काय आहे कारण वाचा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

चाळीसगाव चौफुलीजवळ एका 70 वर्षीय वृद्धाचा अपघात झाला होता. उपचारासाठी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी केली. चाचणीत संबंधित व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता.

धुळे : कोरोना पॉझिटिव्ह एका 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे कोणीही नातेवाईक समोर आले नाहीत, यंत्रणेला सापडले नाहीत, त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने संबंधित व्यक्‍तीवर अंत्यसंस्कार करावे लागले. विशेष म्हणजे संबंधित वृद्ध व्यक्ती मनपा हद्दीत आलेल्या चितोड येथील होती. संबंधित व्यक्तीचे खरेच नातेवाईक नव्हते की कोरोनाच्या धाकाने ते समोर आले नाहीत, हा मात्र प्रश्‍नच आहे. 

चाळीसगाव चौफुलीजवळ एका 70 वर्षीय वृद्धाचा अपघात झाला होता. उपचारासाठी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी केली. चाचणीत संबंधित व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान, 21 जूनला पहाटे संबंधित वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात आला; मात्र कोणीही नातेवाईक सापडले नाहीत. त्यामुळे नियमानुसार मृतावर अंत्यसंस्कार करण्याबाबत सर्वोपचार रुग्णालयाच्या यंत्रणेने महापालिका आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानुसार सहाय्यक सार्वजनिक आरोग्याधिकारी चंद्रकांत जाधव यांनी कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घेऊन संबंधित वृद्ध व्यक्तीवर चक्करबर्डी भागातील जागेवर अंत्यसंस्कार केले. महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक विकास साळवे यांनी अग्निडाग दिला. सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक अमीन पटेल, माजी नगरसेवक सलीम टंकी, श्री. साबीर, इस्लाम अन्सारी, अबू अन्सारी, स्वच्छता निरीक्षक महेंद्र ठाकरे, भरत येवलेकर आदींनी सहकार्य केले. 
 
खरंच नातेवाईक नाहीत की... 
संबंधित मृत 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचे नाव,गाव निष्पन्न झाले. नुकत्याच महापालिका हद्दीत आलेल्या चितोड येथील ते रहिवासी असल्याचेही समोर आले. मात्र, नातेवाइकांचा शोध घेतला असता कोणीही नातेवाईक समोर आला नाही, यंत्रणेलाही कुणी सापडले नाही. त्यामुळे त्या वृद्ध व्यक्तीला खरच नातेवाईक नव्हते की कोरोनाच्या भीतीने पुन्हा एकदा कुणी समोर यायला तयार झाले नाही हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation corona positive parson Funeral death body bevaras