esakal | मालमत्तांचे सर्वेक्षण, पुनर्मूल्यांकन; धुळे मनपाचा निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

हद्दवाढीसह महापालिका क्षेत्रातील सर्वच मालमत्तांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वेक्षण, पुनर्मूल्यांकनाचे काम स्थापत्य कन्स्लंटट प्रा. लि. (अमरावती) ला देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली.

मालमत्तांचे सर्वेक्षण, पुनर्मूल्यांकन; धुळे मनपाचा निर्णय 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : हद्दवाढीसह संपूर्ण महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वेक्षण, पुनर्मुल्यांकनाचा मार्ग अखेर मोकळा झाला. त्यामुळे येत्या काळात कर आकारणी न झालेल्या, वाजवी कर आकारणी नसलेल्या अशा सर्वच मालमत्ता रेकॉर्डवर येतील. त्यांचे पुनर्मूल्यांकन होईल व त्यातून महापालिकेच्या उत्पन्नातही मोठी भर पडेल अशी अपेक्षा आहे. 
हद्दवाढीसह महापालिका क्षेत्रातील सर्वच मालमत्तांच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वेक्षण, पुनर्मूल्यांकनाचे काम स्थापत्य कन्स्लंटट प्रा. लि. (अमरावती) ला देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून भिजत पडलेला प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

रेकॉर्डमधील उणिवा अशा 
शहर हद्दीत १९९२-९३ पासुन संपूर्ण मालमत्तांची फेर आकारणी नाही. १९९६-९७ व २००१ मध्ये केवळ नवीन मालमत्तांच्या आकारणीची कार्यवाही झाली. २००७-०८ मध्ये १९९२-९३ नंतर व २००१-०२ पूर्वीच्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून ४० टक्के कर आकारणीत वाढ करण्यात आली. मात्र मनुष्यबळाअभावी दर पाच वर्षांनी फेर मूल्यांकनाची कार्यवाही झाली नाही. २०१४-१५ मध्ये अकरा कलमी कार्यक्रमांतर्गत अंदाजे २००० मालमत्तांचे मोजमाप झाले. मात्र हे कामही पुढे गेले नाही. अर्थात गेल्या १५ वर्षात शहरातील जुन्या, नव्या मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन झाले नाही. शिवाय अग्नीकांडात २०१० पूर्वीचे रेकॉर्डही नष्ट झालेले आहे. त्यामुळे संपूर्ण मालमत्ता नकाशासहित रेकॉर्डवर उपलब्ध नाही, इमारतीचे वय निश्चित होत नाही, वॉर्ड रचनेप्रमाणे रेकॉर्ड नाही अशी वस्तुस्थिती प्रशासनाने स्थायी समितीपुढे मांडली. 

अशी कार्यवाही आवश्‍यक 
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार दर पाच वर्षांनी हद्दीतील संपूर्ण मिळकतींचे पुनर्मूल्यांकन आवश्यक आहे. संपूर्ण मालमत्तांचे जीआयएस आधारीत प्रत्यक्ष स्थळ सर्वेक्षण करून युनिक प्रॉपर्टी ऑथोरीटी कोड नोंदणी वही तयार करणे, मूल्यांकनासाठी तांत्रिक सर्वेक्षण, अद्ययावत संगणकीकृत नकाशे काढणे, वॉर्डनिहाय मालमत्तांचे डिजिटल फोटो काढणे, संगणकीकृत नकाशे फोटो डेटावरून जोडणे, झोनप्रमाणे नकाशा तयार करणे, ऑनलाइन मालमत्ता कर भरणा प्रणालीद्वारा सुधारीत मूल्यांकन करणे अभिप्रेत आहे. शहराचा वाढता विस्तार, नवीन बांधकामे, जुन्या बांधकामात सुधारणा करून झालेली वाढीव बांधकामे पाहता आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वेक्षण, पुनर्मूल्यांकनाची शिफारस करण्यात आली. 

सद्यःस्थिती अशी 
- रेकॉर्डवर असलेल्या मालमत्ता... ७७ हजार 
- हद्दवाढ क्षेत्रातील मालमत्ता...२० हजार (अंदाजे) 
- मालमत्ता करातून वार्षिक उत्पन्न...२८ कोटी 
 
सर्वेक्षण, पुनर्मूल्यांकनाचे फायदे असे 
- तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अचुकता येईल 
- कर आकारणी नसलेल्या मालमत्तांना कर लागेल 
- वाजवी कर नसलेल्या मालमत्तांना योग्य कर लागेल 
- कर व्यवस्थेची संगणकीय व्यवस्था निर्माण होईल 
- मनपा हद्दीतील नळ कनेक्शनचे सर्वेक्षण होईल 
- मनपा मालकीच्या मालमत्तांचे मूल्यांकन होईल 
- उत्पन्नात दुपटीपेक्षा जास्त वाढीचा अंदाज 
 
अपेक्षित खर्च असा 
- अंदाजे वार्षिक दोन कोटी 
- पाच वर्षासाठी काम 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image