esakal | वादग्रस्त भूखंड प्रकरण; ‘त्या’ अधिकाऱ्याचे कपाट ‘सील' 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

शहरातील सर्व्हे क्रमांक ४८३/अ/२ या भूखंडाच्या अनुषंगाने किशोर बाफना यांच्या विरोधात खुद्द महापालिकेच्या तक्रारी आहेत. महापालिकेचे स्थायी समिती सभापती बैसाणे यांनी हा विषय लावून धरला आहे.

वादग्रस्त भूखंड प्रकरण; ‘त्या’ अधिकाऱ्याचे कपाट ‘सील' 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : शहरातील सर्व्हे क्रमांक ४८३/अ/२ या मिळकतीच्या वादग्रस्त प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या नगररचना विभागातील ट्रेसर संजय बहाळकर यांच्या भूमिकेवरही संशय आहे. या वादग्रस्त भूखंड प्रकरणात कागदपत्र गहाळ होऊ नये, अफरातफर होऊ यासाठी खबरदारी म्हणून स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांच्या आदेशाने बहाळकर यांचे महापालिका कार्यालयातील संबंधित कपाट सील करण्यात आले आहे. त्यामुळे श्री. बहाळकर निवृत्तीच्या उंबरठ्यावर असले तरी त्यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची या प्रकरणातून सुटका होण्याची चिन्हे नाहीत. 
 
शहरातील सर्व्हे क्रमांक ४८३/अ/२ या भूखंडाच्या अनुषंगाने किशोर बाफना यांच्या विरोधात खुद्द महापालिकेच्या तक्रारी आहेत. महापालिकेचे स्थायी समिती सभापती बैसाणे यांनी हा विषय लावून धरला आहे. याच विषयावर महापालिकेच्या महासभेतही जोरदार चर्चा होऊन भूखंडाच्या अनुषंगाने आलेला विषयही नामंजूर झाला होता. या वादग्रस्त भूखंडाबाबत सभापती बैसाणे यांनी नगररचनाकार महेंद्र परदेशी यांनाही स्थायी समिती सभेत चांगलेच धारेवर धरले होते. 
 
अधिकारी- कर्मचाऱ्यांकडूनच आरोप
संबंधित वादग्रस्त भूखंडाच्या अनुषंगाने झालेल्या प्रक्रियेत महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर काही जणांकडून गंभीर आरोप झाले आहेत. इतर अधिकारी-कर्मचाऱ्यांबरोबरच ट्रेसर बहाळकर यांच्या भूमिकेवरही संशय आहे. त्यामुळे महापालिका कार्यालयातील त्यांचे कपाट सील केले आहे. संबंधित प्रकरण न्यायप्रविष्ट असून, या प्रकरणाशी संबंधित कागदपत्र, फायली गहाळ झाल्या तर त्याचा न्यायालयीन प्रक्रियेवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता आयुक्तांना याबाबत कल्पना दिली व त्यानुसार बहाळकर यांचे कपाट काही दिवसांपूर्वीच सील केल्याचे सभापती बैसाणे यांनी सांगितले. 
 
बहाळकरांची कार्यपद्धती वादग्रस्त 
महापालिकेच्या नगररचना विभागात ट्रेसर म्हणून कार्यरत बहाळकर यांची कार्यपद्धती पूर्वीपासूनच वादग्रस्त आहे. ताजा भूखंड प्रकरणाच्या अनुषंगाने बऱ्याच नगरसेवकांनी स्थायी समिती, महासभेत बहाळकर यांच्यावर गंभीर आरोपही केल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, बहाळकर सध्या निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून, ते रजेवर गेले आहेत. 

संपादनः राजेश सोनवणे