गोटे समर्थकांना आठ दिवसांचा "वनवास'! 

गोटे समर्थकांना आठ दिवसांचा "वनवास'! 

धुळे ः आपले येथील मंत्री आणि आमदारांच्या कलहात कार्यकर्त्यांची घुसमट झाल्यानंतरचे "अंडर- करंट' जोखण्यात कमी पडलेल्या भाजपला आता काहीसे शहाणपण सुचले आहे. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी पक्षाने संघटनमंत्री विजय पुराणिक यांना "शिष्टाई'साठी येथे पाठविले. नाराज, उमेदवारी न मिळालेले आणि पक्षांतर्गत वादात धर्मसंकटात सापडलेल्या पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात श्री. पुराणिक यांना काहीसे यश लाभले अन्‌ "त्या' पदाधिकाऱ्यांनी शहराबाहेर निघून जाण्याचा सुवर्णमध्य साधत सुटका करून घेतली आहे. 
महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर धुळे शहर भाजपमय करून टाकण्याचा नेत्यांचा मनसुबा स्व-पक्षाचे तीन मंत्री आणि आमदारांमधील कलहामुळे काहीसा धुळीस मिळाला आहे. गेल्या दीड वर्षापासून मंत्री आणि आमदारांमध्ये विविध कारणांवरून कलह सुरू आहे. यात कमरेखालचे वार होत गेल्याने शहरासह भाजप, संघाच्या प्रतिमेलाही तडा बसत गेला. या स्थितीकडे पक्षस्तरावरून दुर्लक्षच करण्यात आले. परिणामी, केंद्रात व राज्यात भाजपप्रणीत सरकार असतानाही धुळे शहरात भाजप विरुद्ध भाजप, असा संघर्ष मतदारांसह शहराला वेठीस धरणारा ठरल्याचे मानले गेले. या वादात कार्यकर्त्यांची घुसमट होत गेली. 
 
कार्यकर्त्यांची फरफट, कसरत 
पक्षात दुही निर्माण होऊन आपली "किंमत' टिकून राहण्यासाठी किंवा पक्षाची स्थानिक सूत्रे आपल्या "पंजा'त राहण्यासाठी चाललेल्या चढाओढीत निष्ठावंत जुने आणि नवे कार्यकर्ते, असा वाद ऐरणीवर आणला गेला. महापालिका निवडणुकीच्या सहा महिन्यांपूर्वी तो पेटविण्यास सुरवात झाली. यात मंत्र्यांची बाजू घ्यावी की आमदारांची, "तो' मंत्र्यांकडे दिसला की आमदारांना राग, "तो' आमदारांकडे दिसला की मंत्र्यांना राग, अशा स्थितीतही पक्षाची प्रतिमा उंचावलेली राहण्यासाठी फरफटणाऱ्या कार्यकर्त्यांची कसरत सुरू होती. 
 
"खालसा' करण्याचा चंग 
महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे निवडणुकीचे नेतृत्व सोपविले गेले. शहरात पक्षाचा आमदार असताना व विश्‍वासात न घेता हा निर्णय, विरोधकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला गेल्याने आमदार अनिल गोटे यांनी मंत्री महाजन, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह पक्षाविरोधात बंड पुकारले. गोटे यांनी लोकसंग्राम संघटनेच्या माध्यमातून सरासरी 60 उमेदवार देत भाजपला "खालसा' करण्याचा चंग बांधला आहे. 

धर्मसंकट अन्‌ सुटका... 
काही मंत्र्यांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांवर विविध कारणांमुळे नाराज ज्येष्ठ नेते भीमसिंह राजपूत, माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर, संजय बोरसे, डॉ. महेश घुगरी, अनिल पाटील, योगेश मुकुंदे, अमोल भागवत, ऍड. अमित दुसाने यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांपुढे धर्मसंकट उभे राहिले. त्यांना भाजपची बाजू घ्यावी की आमदार गोटे यांच्या लोकसंग्राम संघटनेची, असा पेच पडला. ही कोंडी आणि त्यामागचे "अंडर- करंट' प्रदेश कार्यकारिणीपर्यंत पोहोचले. प्रदेशप्रमुखांनी श्री. पुराणिक यांना धुळ्यात पाठवून नाराज, उमेदवारी न मिळालेले, पक्षापासून काही कारणाने दूर असलेले, परंतु, समाजात चांगले काम, नाव, प्रतिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांची मनधरणी करून पुन्हा भाजपकडे वळविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी जबाबदारी सोपविली. त्याप्रमाणे श्री. पुराणिक यांनी महापालिकेची सत्ता ताब्यात येण्यासाठी भाजपसाठी काम करा, अशी गळ घातली. मात्र, संबंधितांनी धर्मसंकटातून सुटका करून घेण्यासाठी निवडणुकीच्या कालावधीत शहराबाहेर जाण्याचा किंवा घरीच थांबण्याचा निर्णय घेतल्याची रंगतदार चर्चा लपून राहिलेली नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com