esakal | बाप्पाच्या निरोपावेळी सीसीटीव्हीचा वॉच, स्वच्छतेसाठी पथके; धुळ्यात कसे आहे नियोजन पहा 
sakal

बोलून बातमी शोधा

cctv

विसर्जनाच्या अनुषंगाने धुळे महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी विसर्जन मिरवणुकांवर तसेच नदीपात्रात मूर्ती विसर्जनावर बंदी घातली आहे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने शहरात ३७ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे.

बाप्पाच्या निरोपावेळी सीसीटीव्हीचा वॉच, स्वच्छतेसाठी पथके; धुळ्यात कसे आहे नियोजन पहा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : गणेश विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तसेच महापालिकेने विविध भागातील मुख्य चौक व मार्गांवर सार्वजनिक स्वच्छतेसाठी पथकेही नियुक्त केली आहेत. 
विसर्जनाच्या अनुषंगाने धुळे महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी विसर्जन मिरवणुकांवर तसेच नदीपात्रात मूर्ती विसर्जनावर बंदी घातली आहे. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने शहरात ३७ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. या ठिकाणी महापालिकेने विद्युत व्यवस्था व कर्मचारी पथके नियुक्त केली आहेत. प्रभागनिहाय १९ अधिकारी व कर्मचाऱ्यांची समन्वयक म्हणून नियुक्‍ती केली आहे. तसेच संबंधित ३७ ठिकाणी स्वच्छता निरीक्षक व त्यांच्या नियंत्रणात प्रत्येकी तीन स्वच्छता कर्मचारी सकाळी नऊ ते रात्री दहादरम्यान उपस्थित असतील. संकलित होणाऱ्या गणेशमूर्तीच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या २० मालवाहतूक बस सज्ज ठेवल्या आहेत. मालवाहतूक बस सजवून व स्वच्छ करून वापरण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त निर्माल्य संकलनासाठी महापालिकेच्या ३७ घंटागाड्या असतील. अत्यावश्यक प्रसंगी अतिरिक्त पाच माल वाहतूक बस उपलब्ध आहेत. 

सीसीटीव्हीद्वारे नजर 
प्रत्येक मूर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शहरातील विविध भागात व मुख्य चौक व मार्गावर सार्वजनिक स्वच्छतेसाठी महापालिकेचे पथक असेल. दरम्यान, पोलिसांच्या सूचनेप्रमाणे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महापालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. सर्व घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्तींचे संकलन करून तसेच मूर्तीचे पावित्र्य राखून, पूजा करून त्या विसर्जित करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गणेशमूर्ती, निर्माल्य प्रशासनाने निश्‍चित केलेल्या ठिकाणीच दान करावे, अनावश्यक गर्दी टाळावी व कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.