बगीचे बनले ‘जंगले’; मुलांनी खेळावे कुठे! 

रमाकांत घोडराज
Tuesday, 12 January 2021

बगीचांमध्ये झाडे, बाबूंची झोपडी, सुशोभीकरणासाठी टायर व प्लॅस्टिक बाटल्यांचा उपयोग झाला. मात्र, २० पैकी बहुतांश बगीचांची कामे १०० टक्के पूर्ण झाली नाहीत. जेवढे काम झाले त्याचीही नंतर दुरवस्था झाली.

धुळे : शहरात अमृत अभियानातील हरितक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत धुळे शहरात बगीचे विकसित करण्यात आले खरे, पण हे बगीचे म्हणजे शहरातील त्या-त्या भागात उभे राहिलेले जंगल असल्याची नागरिकांची भावना आहे. हरितक्षेत्र विकासाचा उद्देश साध्य होत असला, तरी त्या-त्या भागातील नागरिकांना हक्काने फिरता येणारे बगीचे हिरावले गेले. या जंगलांमुळे सापांसह इतर समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागते. त्यामुळेच ‘सभापती आपल्या दारी’ मोहिमेंतर्गत सभापती सुनील बैसाणे यांच्याकडेही देवपूर भागातील नागरिकांनी अशा बगीचांबाबत तक्रारी केल्या. श्री. बैसाणे यांनी बगीचातील झाडांची छाटणी करण्यासह साफसफाईचा आदेश अधिकाऱ्यांना दिला. 

अमृत अभियानात शहरांमध्ये हरितक्षेत्र वाढावे, यासाठी शासनाने निधी मंजूर केला. तीन-चार वर्षांसाठी महापालिकेला साडेचार-पाच कोटी रुपयांचा निधी मिळाला. या निधीतून महापालिकेने शहरात साधारण २० बगीचांचे काम हाती घेतले. बगीचांमध्ये झाडे, बाबूंची झोपडी, सुशोभीकरणासाठी टायर व प्लॅस्टिक बाटल्यांचा उपयोग झाला. मात्र, २० पैकी बहुतांश बगीचांची कामे १०० टक्के पूर्ण झाली नाहीत. जेवढे काम झाले त्याचीही नंतर दुरवस्था झाली. परिणामी, या बगीचांचा काहाही उपयोग होत नसल्याची नागरिक, नगरसेवकांची ओरड आहे. या बगीचांच्या कामांबाबत तक्रारीही झाल्या. ‘सकाळ’नेही हा विषय जनतेसमोर मांडला. आता तर या बगीचांची देखभाल-दुरुस्ती न झाल्याने या बगीचांचे रूपांतर जंगलात झाल्याचे चित्र आहे. 

सभापतींकडेही गाऱ्हाणे 
सभापती आपल्या दारी मोहिमेंतर्गत स्थायी समिती सभापती बैसाणे यांनी सोमवारी (ता. ११) प्रभाग पाचमधील इंदिरा गार्डन परिसर, तुळशीरामनगर, भरतनगरसह इतर कॉलन्यांमधील नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. तुळशीरामनगरमधील नागरिकांनी आपल्या भागातील बगीचाबाबत श्री. बैसाणे यांच्याकडे तक्रारी केल्या. बगीचांमध्ये घाण, कचरा आहे. झाडेझुडपे वाढलेली आहेत. साप निघतात, अशा तक्रारी प्रभागातील नागरिकांकडे यापूर्वीही झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर श्री. बैसाणे यांनी बगीचामध्ये साफसफाईसह झाडांचा विस्तार कमी करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. प्रभागातील बंद पथदीप, रोडक्रॉस गटारी, चेंबर साफसफाईच्याही सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. नगरसेवक देवरे, भगवान गवळी तसेच प्रभागातील नागरिक अरुण पवार, भटू चौधरी, राजेंद्र मोराणकर, श्री. भदाणे, श्री. चौधरी, नाना पाठक, रूपेश पाटील, श्री. बोरसे, सुभाष भदाणे आदी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation garden in jungal child no play ground