esakal | शहरातील कचरा संकलन पुन्हा ठप्प; अधिकाऱ्यांचे हात मात्र वर 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

घंटागाड्यांवरील कामगारांच्या पगाराची काही समस्या आहे. मात्र, हा ठेकेदाराचा ‘इंटर्नल प्रॉब्लेम’ (अंतर्गत प्रश्‍न) आहे.  -शांताराम गोसावी, उपायुक्त, महापालिका, धुळे

शहरातील कचरा संकलन पुन्हा ठप्प; अधिकाऱ्यांचे हात मात्र वर 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : चार-आठ दिवस लोटत नाहीत तोच शहरातील कचरा संकलनाचा प्रश्‍न धुळेकरांच्या डोक्यावर उभा राहतो. आता दोन दिवसांपासून घंटागाड्या बंद आहेत. महापालिकेकडून बिल न मिळाल्याने कामगारांचा पगार व इंधन खर्च करता येत नसल्याने घंटागाड्यांना ब्रेक लागल्याचे सांगण्यात येते. मात्र, महापालिकेचे अधिकारी व ठेकेदाराचा हा अंतर्गत प्रश्‍न असल्याचे म्हणत कचरा संकलनप्रश्‍नी हात वर करीत असल्याचे दिसते. 
शहातील कचरा संकलनाचे काम नाशिकस्थित वॉटरग्रेस कंपनीला दिले आहे. १७ कोटींवर खर्चातून तीन वर्षांसाठी हे काम कंपनीला दिले. मात्र, कचरा संकलनाची समस्या कायम आहे. चार-आठ दिवस होत नाहीत तोच काही ना काही समस्या उभ्या राहतात. त्यामुळे नागरिक व नगरसेवकांच्या तक्रारी सुरू होतात. आता दोन दिवसांपासून पुन्हा घंटागाड्या बंद झाल्या आहेत. बुधवारी (ता. ७) निम्म्या घंटागाड्या बंद होत्या. गुरुवारी (ता. ८) सर्वच घंटागाड्यांना ब्रेक लागला. त्यामुळे शहरातील कचरा संकलनाचे काम पूर्णपणे ठप्प झाले आहे. 

बिल न मिळाल्याने समस्या 
कचरा संकलन ठेकेदाराला मागील सादर बिलांची अदायगी महापालिकेकडून झालेली नाही. त्यामुळे कामगारांचा पगार व इंधनासाठी लागणारा खर्च करता येत नसल्याने घंटागाड्या बंद केल्याचे सांगितले जाते. ठेकेदाराने ही बाब अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती मिळाली. ठेकेदाराचे किती महिन्यांचे व किती रकमेचे बिल महापालिकेकडे थकीत आहे, यातून काय तोडगा निघणार हे मात्र समजू शकले नाही. त्यामुळे सध्यातरी शहरातील कचरा संकलनाचा पुन्हा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. परिणामी, स्वच्छतेत देशात नाव कमावलेल्या धुळे शहराचा पुन्हा ‘कचरा’ तर होणार नाही ना, अशी भीती आहे. 

नागरिकांच्या तक्रारी कायम 
आठ-आठ दिवस घंटागाड्या येत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. वाडीभोकर रोडवरील गजाननबाबा हाउसिंग सोसायटी, सर्वेश्‍वरनगर, शिवाजीनगर, रेणुकानगर, अभियंतानगर, कल्पना सोसायटी आदी भागांत आठ दिवस झाले घंटागाडी पोचलेली नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. घरादारातील डस्टबिन कचऱ्याने फुल्ल झाल्या आहेत. मात्र, कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्‍न आता नागरिकांपुढे आहे. हीच स्थिती शहराच्या विविध भागांत आहे. 
 
म्हणे... ठेकेदाराला अंतिम संधी 
शहरातील कचरा संकलन ठेकेदाराला महापालिकेने यापूर्वी नोटिसा बजावलेल्या होत्या. या नोटिसांच्या अनुषंगाने गुरुवारी महापालिकेत ठेकेदाराची सुनावणी झाली. कचरा संकलनाच्या तक्रारी व त्रुटींबाबत ठेकेदाराला अधिकाऱ्यांनी कल्पना दिली. आता ठेकेदाराला याबाबत उत्तर देण्यासाठी आठ दिवसांची मुदत दिली आहे. १६ ऑक्टोबरला याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, ठेकेदाराला ही शेवटची संधी आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 
 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image