मुलगा झाला अन्‌ हातात दिली मुलगी; पण गैरसमज असल्‍याचे स्‍पष्‍ट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 22 September 2020

सकाळी दहाच्या सुमारास श्री. पवार यांच्या मामी चंद्रकला सोनवणे यांच्याकडे बाळाला कापडात गुंडाळून दिले गेले. ते बाळ मुलगा नसून मुलगी असल्याचे समजले, असे नातेवाइकांचे म्हणणे होते.

धुळे : मुलगा झाल्याचे सांगितले आणि प्रत्यक्षात हातात मुलगी दिली, असा आरोप बाळाचे वडील व नातेवाइकांनी केल्याने महापालिकेच्या दवाखान्यात मंगळवारी (ता. २२) या विषयावर दिवसभर उलट-सुलट चर्चा रंगली होती. दरम्यान, असा कोणताही प्रकार झालेला नसून संबंधितांना याबाबत निव्वळ गैरसमज झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

महापालिकेच्या जुन्या इमारतीमधील सूतिकागृहात मंगळवारी सकाळी चाळीसगाव रोड भागातील पवननगरमधील पुष्पांजली विनोद पवार यांची प्रसूती झाली. बाळाचे वडील विनोद पवार यांना तेथील नर्सने मुलगा झाल्याचे सांगितले. खुशाली म्हणून श्री. पवार यांनी तेथील कर्मचाऱ्यांना २०० रुपये दिले. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी मुलगा झाल्याचे म्हणत ५०० रुपये मागितले, श्री. पवार यांनी आनंदात तेही दिले. नंतर सकाळी दहाच्या सुमारास श्री. पवार यांच्या मामी चंद्रकला सोनवणे यांच्याकडे बाळाला कापडात गुंडाळून दिले गेले. ते बाळ मुलगा नसून मुलगी असल्याचे समजले, असे नातेवाइकांचे म्हणणे होते. या काळात पवार कुटुंबीयांनी मुलगा झाल्याची बातमी नातेवाईकांना देऊन टाकली. मात्र, प्रत्यक्षात हातात मुलगी आल्याने सारेच बुचकळ्यात पडले. पैसे घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुलगा झाल्याचे सांगितल्याचा आरोपही श्री. पवार यांनी केला. तसेच मुलगी झाल्याचा आनंदच आहे, मात्र या प्रकाराने संभ्रमात भर पडली. त्यामुळे बाळाची डीएनए टेस्ट करा, अशी मागणीही श्री. पवार यांनी केली. 
 
असा कोणताही प्रकार नाही 
मुलगा झाला आणि हातात मुलगी दिली, असा कोणताही प्रकार झालेला नाही. संबंधित बाळाच्या नातेवाइकांचा याबाबत गैरसमज झाल्याचे सूतिकागृहाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना देशमुख यांनी सांगितले. सूतिकागृहात रात्री व पहाटे मिळून एकूण पाच प्रसूती झाल्या, प्रत्येक महिलेच्या प्रसूतीमध्ये अंतर आहे. शिवाय पाचपैकी चार मुली व एका मुलाचा जन्म झाला. यात मुलाचा जन्म रात्री दोनला, तर संबंधित श्रीमती पवार यांची प्रसूती पहाटे झाली. सर्व कागदपत्रेही बरोबर आहेत. त्यामुळे हा प्रकार केवळ गैरसमजातून झाल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. संबंधित महिलेसोबत आलेल्या आशा वर्करचे जबाब घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation hospital change child case