esakal | धुळ्यात तीन महिन्यात अडीच कोटींवर कामे 
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule corporation

मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोना संकटानंतर नऊ-दहा महिन्यानंतर सर्व व्यवहारांची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. कोरोनाच्या या संकटामुळे महापालिकेच्या कर वसुलीवरही परिणाम झाला.

धुळ्यात तीन महिन्यात अडीच कोटींवर कामे 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्याही आर्थिक स्थिती कमकुवत झाली असली तरी महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामांच्या मंजुरीला ब्रेक लागलेला नाही. छोटी- मोठी कामे नियमितपणे सुरू आहेत. महापालिका आयुक्तांनाच आपल्या स्तरावर असलेल्या २५ लाखापर्यंतच्या मंजुरीच्या अधिकारांचाच विचार केला तर गेल्या तीन महिन्यात बांधकाम विभागाने अडीच कोटींच्या निधीवर कामांचे कार्यादेश दिले. विशेष म्हणजे यातील सुमारे दोन कोटींची कामे मनपा निधीतील आहेत. 

मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोना संकटानंतर नऊ-दहा महिन्यानंतर सर्व व्यवहारांची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. कोरोनाच्या या संकटामुळे महापालिकेच्या कर वसुलीवरही परिणाम झाला. असे असले तरी कोरोनाच्या काळातही महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध कामे मंजूर केली गेली. स्थायी समिती, महासभेव्यतिरिक्त केवळ महापालिका आयुक्तांना असलेल्या ५ ते २५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरीच्या अधिकारातच गेल्या तीन महिन्यात अडीच कोटींवर कामे मंजूर झाल्याचे दिसते.१५ ऑक्टोबर ते ११ डिसेंबर २०२० व ११ डिसेंबर २०२० ते १५ जानेवारी २०२१ दरम्यान महापालिकेच्या बांधकाम विभागाने एकूण २५ कामांचे कार्यादेश दिले. यात पाइपलाइन टाकणे, काँक्रीट रस्ता, रस्ता डांबरीकरण, अमधाम येथे अंत्यविधीचे ओटे दुरुस्ती, काँक्रीट गटार, खुल्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविणे, आरसीसी गटार, बंदिस्त गटार, ओपनस्पेस विकसित करणे, राजे संभाजी महाराज पुतळ्यासाठी चबुतरा बांधणे, सभागृह बांधकाम आदी कामांचा यात समावेश आहे. 

दोन कोटी मनपा तिजोरीतून 
आयुक्तांनी आपल्या अधिकारात मंजूर केलेल्या कामांमध्ये एक कोटी ९१ लाख ५२ हजार १९८ रुपये खर्चाची कामे मनपा निधीतील आहेत. अर्थात अडीच कोटीतून सुमारे दोन कोटी रुपयांच्या कामांसाठी महापालिकेच्या तिजोरीतूनच खर्च होणार आहेत. 

विविध कामांसाठी खर्च असा 
- मनपा निधी.................१,९१,५२,१९८ 
- रस्ता अनुदान..................१४,९९,६०९ 
- आमदार निधी..................२९,९२,९१२ 
- खासदार निधी...................९,९९,९८८ 
- आर्थिक दुर्बल घटक निधी...९,९९,३२८ 
- अमरधाम दुरुस्तीअंतर्गत.......७,२३,१९७ 
- एकूण............................२,६३,६७,२३२ 

संपादन ः राजेश सोनवणे