esakal | रस्ते खोदले ७४ किलोमीटर; दुरुस्ती आठच किलोमीटर 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न किती गंभीर आहे, याचा प्रत्यय आला. हाच धागा पकडून ‘स्थायी‘त सदस्यांनी देवपूरमध्ये एकतरी चांगला रस्ता दाखवा असे आव्हानच एमजेपीच्या अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान ठेकेदाराला का घाबरता?, ऐकत नसेल तर दंड करा, ब्लॅकलिस्ट करा अशी मागणीही सभेत करण्यात आली. 

रस्ते खोदले ७४ किलोमीटर; दुरुस्ती आठच किलोमीटर 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील भुयारी गटार योजनेंतर्गत तब्बल ७४ किलोमीटरची वाहिनी टाकली गेली, मात्र केवळ आठच किलोमीटर रस्त्याची दुरुस्ती केल्याची माहिती एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी आज झालेल्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत दिली. त्यामुळे देवपूर भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न किती गंभीर आहे, याचा प्रत्यय आला. हाच धागा पकडून ‘स्थायी‘त सदस्यांनी देवपूरमध्ये एकतरी चांगला रस्ता दाखवा असे आव्हानच एमजेपीच्या अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान ठेकेदाराला का घाबरता?, ऐकत नसेल तर दंड करा, ब्लॅकलिस्ट करा अशी मागणीही सभेत करण्यात आली. 

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा गुरुवारी (ता.१८) ऑनलाइन झाली. सभापती सुनील बैसाणे, नगरसचिव मनोज वाघ, साहाय्यक आयुक्त विनायक कोते कमलेश देवरे, अमोल मासुळे, भारती माळी, संतोष खताळ प्रत्यक्ष तर इतर सदस्य ऑनलाइन उपस्थित होते. सदस्य श्री. देवरे यांनी देवपूर भागातील भुयारी गटार योजनेच्या कामाचा विषय पुन्हा मांडत एमजेपीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. योजनेंतर्गत देवपूर भागात सर्वच रस्ते खोदले पण दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. वारंवार प्रश्‍न मांडूनही कार्यवाही होत नाही. राज्यात एकवेळ राज्यपाल भेटू शकतात पण एमजेपीचे अधिकारी भेटत नाहीत अशी कोपरखळीही त्यांनी लगावली. 

केवळ ८ किलोमीटर काम 
भुयारी गटार योजनेंतर्गत किती किलोमीटर वाहिनी टाकली गेली व किती किलोमीटर रस्ते दुरुस्त केले याची माहिती एमजेपीच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत ७४ किलोमीटर वाहिनी टाकल्याचे सांगत आठच किलोमीटरचे रस्ते दुरुस्त केल्याची माहिती दिली. त्यामुळे रस्ते दुरुस्तीचे काम अत्यल्प असल्याचे यानिमित्ताने समोर आले. 

चांगला रस्ता दाखवा 
देवपूर भागात चांगला रस्ता दाखवा, त्याची पाहणी करतो असे सभापती श्री. बैसाणे यांनीच एमजेपीच्या अधिकाऱ्यांना उद्देशून सांगितले. त्यावर सोमवारी (ता.२१) असा चांगला रस्ता दाखविण्याचे आश्‍वासन एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. 

अन्यथा ब्लॅकलिस्ट करा 
योजनेंर्गत कामाबाबत तक्रारी झाल्यानंतर एमजेपीने ठेकेदाराशी जो पत्रव्यवहार केला आहे. त्यावर नोटीस असा उल्लेखदेखील केलेला नाही. थातूरमातूर पत्रव्यवहार झाला. ठेकेदाराला नोटीस बजावणे अथवा कारवाई करण्यास का घाबरता असा सवालही श्री. देवरे यांनी एमजेपीच्या अधिकाऱ्यांना केला. ठेकेदार कामाबाबत ऐकत नसेल तर दंड करा, ब्लॅकलिस्ट करा अशी मागणीही केला. त्यावर सभापती श्री. बैसाणे यांनी ब्लॅकलिस्ट करण्याबाबतही तयारी ठेवा असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. 
 

loading image
go to top