esakal | यंत्रणा जुंपलेली, पण ‘आऊटपुट’ दिसेना! 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation

‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ राज्य शासनाने सुरू केले आहे. अभियानाचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर व दुसरा टप्पा १२ ते २४ ऑक्टोबर असा आहे. धुळे शहरातील सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेच्या यंत्रणेवर आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा कालावधीही संपला.

यंत्रणा जुंपलेली, पण ‘आऊटपुट’ दिसेना! 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे : कोरोना विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नातच ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियान सुरू आहे. या मोहिमेंतर्गत धुळे महापालिकेची मोठी यंत्रणा कामाला लावली आहे, पण या यंत्रणेच्या कामाचे फलित (आऊटपुट) मात्र समोर येताना दिसत नाही. महापालिकेची संबंधित वरिष्ठ यंत्रणा याबाबत कमी पडत असल्याचे चित्र दिसते. यापूर्वीच्या कंटेनमेंट झोनच्या सर्वेक्षणातही यंत्रणेच्या श्रमाचे चीज झाल्याचे दिसून आले नाही. 
राज्यातील कोरोना संसर्गाचे थैमान रोखण्यासाठी विविध उपाययोजनांमधील महत्त्वाकांक्षी अभियान ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ राज्य शासनाने सुरू केले आहे. अभियानाचा पहिला टप्पा १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर व दुसरा टप्पा १२ ते २४ ऑक्टोबर असा आहे. धुळे शहरातील सर्वेक्षणाची जबाबदारी महापालिकेच्या यंत्रणेवर आहे. अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा कालावधीही संपला. मात्र, या कामाची माहिती महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगता येत नाही. 

अधिकाऱ्यांची विनाकारण व्यस्तता 
महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही अधिकारी- कर्मचारी सातत्याने व्यस्त असल्याचे भासवतात. त्यांच्या या व्यस्ततेचे ‘आऊटपुट’ मात्र दिसत नाही. एकाही अधिकाऱ्याला सर्वेक्षणाबाबत माहिती देता येत नाही. त्यामुळे अभियानातून नेमके काय आऊटपुट मिळाले त्याचाही थांगपत्ता लागत नसल्याचे दिसते. या सर्वेक्षणाकडे अधिकाऱ्यांनी सुरवातीला दुर्लक्ष केले, गांभीर्य दाखविले नाही. त्यामुळे या सर्वेक्षणाबाबत धुळे महापालिकेचे काम मागे पडले होते. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून याबाबत विचारणा झाल्याचे सूत्रांकडून समजते. 

कंटेनमेंट सर्वेक्षणाचीही गत तीच 
कोरोनाबाधितांचा लवकरात लवकर शोध लागावा, यासाठी महापालिकेने सुरवातीपासूनच कंटेनमेंट झोनमध्ये घरोघरी सर्वेक्षण सुरू केले होते. यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावली. कंटेनमेंट झोनमधील सर्वेक्षणात दोन- अडीच हजार संशयितांचे स्क्रीनिंग झाले. त्यापैकी केवळ ५०- ५५ नागरिक बाधित (कोरोना पॉझिटिव्ह) निघाल्याचे अधिकारी म्हणतात. प्रत्यक्षात शहरातील कोरोनाबाधितांची संख्या मात्र वाढतच आहे. 

आता तांत्रिक समस्येचा सामना 
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियानाची माहिती अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, आकडेवारी, माहिती यशस्वीरीत्या अपलोड झाल्याचे तांत्रिक प्रणालीत दिसते. डॅशबोर्डवर मात्र ही आकडेवारी, माहिती अपडेट होत नसल्याची समस्या आहे. ही समस्या केवळ धुळे महापालिका स्तरावर नाही, तर राज्य पातळीवर आहे.

संपादन ः राजेश सोनवणे