
धुळे शहर नागरी समस्यांनी ग्रस्त आहे. शहरातील सर्वच रस्ते खराब आहेत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकीही व्यवस्थित चालविता येत नाही. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शहरात रोज कुठे ना कुठे अपघात होतात.
धुळे : महापालिकेचा बजेट पाचशे-सातशे कोटींचे असताना, नागरी समस्या सोडविण्यासाठी महापालिका खर्च का करत नाही, असा प्रश्न करत कारभार सुधारा, अन्यथा नगरसेवक, अधिकाऱ्यांना शहरात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेसने शुक्रवारी (ता. ४) दिला. शहरातील विविध नागरी समस्यांप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर शाखेने शुक्रवारी महापालिकेत निदर्शने केली.
धुळे शहर नागरी समस्यांनी ग्रस्त आहे. शहरातील सर्वच रस्ते खराब आहेत. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकीही व्यवस्थित चालविता येत नाही. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शहरात रोज कुठे ना कुठे अपघात होतात. निम्म्या घंटागाड्या बंद असल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. अनेक भागांमध्ये सहा-सहा महिन्यांपासून पथदीप बंद आहेत. तक्रार करूनही ते सुरू होत नाहीत. पथदीप नसल्याने चोरटे अंधाराचा फायदा घेतात. अशा सर्व समस्या असताना, महापालिका काहीही काम करताना दिसत नाही, किंबहुना महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, लोकांना फसविण्याचे काम करीत आहे.
अपघातांची जबाबदारी घ्यावी
रस्ता खोदणारा ठेकेदार, कचरा ठेकेदार यांच्यासह संबंधित कामचुकारांवर कारवाई करावी. महापालिकेने शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त करावेत अथवा रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे होणाऱ्या अपघातांची संपूर्ण जबाबदारी घ्यावी, तसेच कचरा ठेकेदारावर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे, पथदीप सुरू करावेत, अन्यथा नागरिकांना एक वर्ष मालमत्ताकरातून सूट द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली. समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करू, महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांना शहरात फिरू देणार नाही, असा इशाराही राष्ट्रवादीने दिला. मागण्यांच्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रवेशद्वारात निदर्शने करून घोषणाबाजी केली. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रणजित भोसले, महेंद्र शिरसाठ, युवा नेते सत्यजित सिसोदे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सरोज कदम, नगरसेवक उमेर अन्सारी, कार्याध्यक्ष तेजस गोटे, वसीम बारी, राजू चौधरी, वामन मोहिते, संजय बगदे, नंदू येलमामे, भूषण कटारिया, एजाज शेख, निखिल वाघ, मनोज कोळेकर, नीलेश चौधरी, अस्लम खाटीक, किरण बागूल, सचिन पोतेकर, संजीवनी पाटील, शोभा आखाडे, रूपाली झाल्टे, ॲड. तरुणा पाटील आदी सहभागी होते.
संपादन ः राजेश सोनवणे