प्लॅस्‍टिक पिशव्यांसाठी दिले पंधरा हजार

रमाकांत घोडराज
Friday, 27 November 2020

राज्यात प्लॅस्टिक बंदी आहे. कोरोना संकटाच्यापूर्वी शहरात याबाबत मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली. कोरोना संकटामुळे मात्र संपूर्ण यंत्रणा कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध व नियंत्रणाच्या कामात व्यस्त होती.

धुळे : प्लॅस्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरही महापालिकेच्या पथकाने अधून-मधून कारवाई सुरू केली आहे. शहरातील साक्रीरोडवरील तीन बेकरी दुकानदारांवर अशी कारवाई करत प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण १५ हजार रुपये पथकाने दंड वसूल केला. 

राज्यात प्लॅस्टिक बंदी आहे. कोरोना संकटाच्यापूर्वी शहरात याबाबत मोठ्या प्रमाणावर कारवाई झाली. कोरोना संकटामुळे मात्र संपूर्ण यंत्रणा कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध व नियंत्रणाच्या कामात व्यस्त होती. दरम्यान, सध्या संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने महापालिकेच्या पथकाने अधून- मधून प्लॅस्टिक बंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उचलल्याचे दिसते. दोन दिवसांपूर्वी पाचकंदील भागात कारवाई झाल्यानंतर काल रात्री शहरातील साक्रीरोडवरील दुकानदारांवर कारवाई झाली. 

या ठिकाणी केली कारवाई
कारवाई पथकाला कुमारनगर भागातील भाग्यशाली बेकरी, रमेश बेकरी व सतनाम बेकरी यांच्याकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या (कॅरी बॅग) चा वापर आढळून आला. त्यामुळे पथकाने या दुकानांमधून १०० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून प्रत्येकी पाच हजार रुपये असा एकूण १५ हजार रुपये दंडही वसूल केली. महापालिकेचे सार्वजनिक साहाय्यक आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील, स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, गजानन चौधरी, संदीप मोरे, साईनाथ वाघ, विकास साळवे, अनिल जावडेकर, शशिकांत जाधव, रुपेश पवार, किशोर मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation plastic carry bag use chandler